मंत्री आदित्य ठाकरेंची ताडोबा सफारी; दोन दिवसांच्या मुक्कामानंतर मुंबईला रवाना

राज्याचे पर्यावरण मंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे मुंबई येथून सोमवारी ताडोबा सफारीवर आले होते. चिमूर मार्गे ताडोबात पोहचले. दोन दिवस ते येथे मुक्कामी होते. त्यांच्या दौऱ्याबाबत कुठेही नोंद नाही.

    चंद्रपूर (Chandrapur).  राज्याचे पर्यावरण मंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे मुंबई येथून सोमवारी ताडोबा सफारीवर आले होते. चिमूर मार्गे ताडोबात पोहचले. दोन दिवस ते येथे मुक्कामी होते. त्यांच्या दौऱ्याबाबत कुठेही नोंद नाही. त्यांच्या ताडोबा दौऱ्याबाबत अंत्यत गोपनीयता बाळगण्यात आली. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांनी ताडोबा सफारी केली होती. येथील वाघांच्या आर्कषनाने ते परत ताडोबा भ्रमंतीसाठी आले. तीन दिवसांच्या भ्रमंतीदरम्यान त्यांना अनेक ठिकाणी वाघ दिसले त्याशिवाय अन्य प्राण्याचेसुद्धा दर्शन झाले.

    ३ दिवसांचा गोपनीय दौरा
    ताडोबा अभयारण्यात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सोमवारी सफारीसाठी आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी या दौऱ्याची माहिती कोणालाही न देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या दौऱ्याची गोपनीयता बाळगण्यात आली. सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी त्यांनी वेगवेगळ्या गेटमधून प्रवेश घेऊन पर्यटनाचा आनंद घेतला. १५ मार्चला ते मुंबईवरून नागपूरला आले होते. तेथून चिमूर मार्गाने ताडोब्याला पोहोचले. शासकीय दौरा नसल्याने अधिकारी, पक्ष कार्यकर्ते यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

    खुंटवंडा गेट परिसरातील एका खासगी रिसॉर्टमध्ये ते मुक्कामी होते. बुधवारी मुंबईसाठी रवाना होतानाची माहिती मिळाली. मंगळवारी त्यानी मोहुर्ली गेटमधून प्रवेश केल्यानंतर त्यांना वाघाचे दर्शन झाल्याची माहिती मिळाली. सायंकाळी बफरझोनची पर्यटनवारी केली. यापूर्वीही ते सफारीसाठी आले होते. त्यावेळी चिमूरच्या वन्यविलास रिसॉर्टमध्ये थांबून त्यांनी तीन दिवस पर्यटनवारीचा आनंद घेतला होता.