कोरोनामुळे पालकांचे छत्र हरवलेल्या सार्थकची मंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट घेऊन केली विचारपूस…

कोरोनामुळे कुणाची आई किंवा वडील गेले आहेत तर काही बालकांचे आई-वडिल दोघांचेही निधन झाले आहे. अशाच एका बालकाची शनिवारी मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्याच्या घरी जाऊन स्वत: विचारपूस केली. चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या सार्थक नरेश तिजारे या बालकाच्या आई-वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. या संकटात एकट्या पडलेल्या सार्थकची मंत्री यशोमती ठाकूर यांनी विचारपूस केली.

    चंद्रपूर :कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील अनेक बालक अनाथ झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे कुणाची आई किंवा वडील गेले आहेत तर काही बालकांचे आई-वडिल दोघांचेही निधन झाले आहे. अशाच एका बालकाची शनिवारी मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्याच्या घरी जाऊन स्वत: विचारपूस केली. चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या सार्थक नरेश तिजारे या बालकाच्या आई-वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे सध्या तो अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा या गावात आपल्या मामाकडे राहतोय.

    दरम्यान या संकटात एकट्या पडलेल्या सार्थकची  मंत्री यशोमती ठाकूर यांनी विचारपूस केली. कोरोनामुळे राज्यातील अनेक मुलांवर अनाथ होण्याची वेळ आली आहे. या सर्व मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सरकारने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. “या योजनेचा लाभ 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालक ज्यांच्या दोन्ही पालकांचे 1 मार्च, 2020 किंवा त्यानंतर कोविड-19 च्या संसर्गामुळे निधन झाले आहे, अशा बालकांना होणार आहे. या कालावधीत कोविड संसर्गामुळे एका पालकाचा आणि इतर कारणाने दुसऱ्या पालकाचा मृत्यू झाला आहे अशा बालकांचाही समावेश आहे.

    तसेच 1 मार्च 2020 पूर्वी कोणत्याही कारणाने एका पालकाचा आणि त्यानंतर कोविड संसर्गाने एका पालकाचा मृत्यू झाला आहे, अशा बालकांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनाथ झालेल्या मुलांच्या नावे प्रत्येकी 5 लाख रुपये मुदत ठेव ठेवली जाणार आहे. ही मुलं 21 वर्षांची झाल्यावर त्यांना व्याजासह ही रक्कम मिळेल. तसेच अशा अनाथ झालेल्या बालकांची माहिती नागरिकांनी संबंधित यंत्रणांना दिल्यास त्या मुलांना मदत करता येईल असे आवाहनही यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.