प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्यात व चंद्रपूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोना या महामारीमुळे जिवती या अतिदुर्गम भागात जनता भयभीत झालेली आहे. जिवती तालुका निर्माण होऊन अकरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटून गेलेला आहे.

  चंद्रपूर (Chandrapur).  देशात, राज्यात व जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोना या महामारीमुळे जिवती या अतिदुर्गम भागात जनता भयभीत झालेली आहे. जिवती तालुका निर्माण होऊन अकरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटून गेलेला आहे. तालुका तिथे ग्रामीण रुग्णालय हे शासनाचे धोरण असतानाही केवळ जिवती हा विदर्भातील मागास व कुपोषणग्रस्त तालुका असल्यामुळे अनेक सरकारे बदलली तरी अजूनपर्यंत जिवती या तालुकास्थळी ग्रामीण रुग्णालय मंजूर करून सुरू केले नाही.

  जिवती तालुक्यात 145 गावे, गुढे, वाड्या, पाडे असून दुर्गम व डोंगराळ असा हा तालुका आहे. दुर्दैवाने तेलंगाणा सिमेलगतच्या गावातील रुग्णांना तेलंगणा राज्यात जाऊन उपचार घ्यावा लागतो, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. तालुक्यात ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार Adv. वामनराव चटप यांनी केली आहे.

  तालुक्यात खासगी डॉक्टरसुद्धा नाही
  तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणारी ग्रामीण रुग्णालयाची सेवाच उपलब्ध नाही, शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र व फिरते रुग्णालय असणाऱ्या मुख्यालयी दुर्गम डोंगराळ व अविकसित भाग असल्यामुळे कुणीही वैद्यकीय अधिकारी किंवा सहाय्यक वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहात नाही. शिवाय विशेषज्ञ तर सोडाच पण एमबीबीएस खासगी डॉक्टरही या तालुक्यात उपलब्ध नाही.

  मुख्यालयी रुग्णालय द्या
  ग्रामीण भागातील नागरिकांचे व्यापक जनहित लक्षात घेता कोरोना महामारीच्या संकटात नागरिकांना चांगली आरोग्य सेवा तत्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने जिवती या मुख्यालयी ग्रामीण रुग्णालय निर्माण करून निधी उपलब्ध करून द्यावा आणि हे रुग्णालय तत्काळ सुरू करावे तसेच विदर्भातील आरोग्यसेवेचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.