जे काम सार्वजनीक बांधकाम विभागाला जमलं नाही ते काम ठाणेदार सत्यजित आमले यांनी करुन दाखवलं

गडचांदूर ते कोरपना रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. संबंधित सार्वजनीक बांधकाम विभागाला अनेकदा ही बाबा लक्षात आणून देखील बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. या खड्ड्यांमुळे या परिसरात रोज अपघात होत आहेत.

    चंद्रपुर – चंद्रपुर जिल्ह्यातील गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले सध्या त्यांनी केलेल्या समाजसेवेबद्दल चर्चेत असून, सध्या त्यांना खाकी वर्दीत माणुसकी जपणारा अधिकारी म्हणून कौतुकाची थाप मिळत आहे.

    गडचांदूर ते कोरपना रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. संबंधित सार्वजनीक बांधकाम विभागाला अनेकदा ही बाबा लक्षात आणून देखील बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. या खड्ड्यांमुळे या परिसरात रोज अपघात होत आहेत.

    अपघाताला महामार्गावरील खड्डे कारणीभुत असल्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांना माहिती पडताच त्यांनी गांधी जयंतीच्या दिवशी महामार्गवरील खड्डे बुजविण्याचे कार्य हाती घेत गांधीगिरी करत खड्डे बुजवले.

    राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील, औद्योगिक शहर गडचांदूर ते कोरपना दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. २९ सप्टेंबरला खड्यामुळे तीन अपघात झाले. त्यात एकाला जीव ही गमवावा लागला. अनेक किरकोळ अपघात इथं नेहमीच होतात. मात्र तरीही बांधकाम विभागातील कोणताही अधिकारी यावर लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे या खड्ड्यांच्या प्रश्नावर खुद्द ठाणेदारांनी उचललेले हे पाऊल प्रशंसनीय असून सर्व स्तरावर ठाणेदार सत्यजित आमले यांचे कौतुक होत आहे.