बालविवाह रोखण्यास यश; प्रशासन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्न

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याअंतर्गत २२ एप्रिलला अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार असल्याची माहिती बाल ग्रामसमिती व तालुका बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा मुलचे तहसीलदार रवींद्र होळी व सदस्य सचिव तथा मुलच्या बालविकास प्रकल्प अधिकारी जगताप यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना दिली.

    चंद्रपूर (Chandrapur).  जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याअंतर्गत 22 एप्रिलला अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार असल्याची माहिती बाल ग्रामसमिती व तालुका बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा मुलचे तहसीलदार रवींद्र होळी व सदस्य सचिव तथा मुलच्या बालविकास प्रकल्प अधिकारी जगताप यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना दिली. सदर माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे यांच्या निदर्शनास आणून दिली.

    त्यानुसार बालविवाह रोखण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नरड यांच्या मार्फत बालकांच्या वयाचे पुरावे प्राप्त करुन पोलिस प्रशासनाचे सहाय्य घेत पोलिस उपअधिक्षक देशमुख व गोंडपिपरीचे पोलिस निरीक्षक धोबे, मुल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजपुत, गोंडपिपरीचे तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका बाल संरक्षण समिती मेश्नाम व गोंडपिपरीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी शरद पारखी यांच्या समन्वयातुन सदर बालविवाह रोखण्यात आला आहे.

    बालकास बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले असून बालकाच्या पालकांकडून करार पत्र भरुन घेत बालकाचे समुपदेशन करून पालकाच्या ताब्यात देण्यात आले व मुलाला वयाचे 21 वर्ष व मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे लिहून घेण्यात आले. सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) राजेश भिवदरे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा मडावी, ग्रामसेवक तसेच बाल ग्राम संरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते.