स्मार्टफोनसाठी विवाहित महिलेची आत्महत्या; आप्तस्वकियांना जबर मानसिक धक्का

घुग्घुस शहरात हिमाचल लाईन शास्त्रीनगरात एका विवाहितेने पतीने मोबाईलचा हट्ट पुरविला नाही म्हणून गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

    घुग्घुस (Ghughhus).  शहरात हिमाचल लाईन शास्त्रीनगरात एका विवाहितेने पतीने मोबाईलचा हट्ट पुरविला नाही म्हणून गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घुग्घुस येथील लक्ष्मी सुरेश कुम्मरी असे मृत विवाहितेचे नाव असून तिला असलेल्या 8 महिने व 2 वर्षाचे अपत्य आहे.

    हिमाचल लाईन शास्त्रीनगर परिसरात सुरेश कुम्मरी वास्तव्यास आहे. त्यांचे पेंटिंगचे काम आहे. त्याच कामाच्या भरवश्यावर पत्नी लक्ष्मी, 8 महिने आणि 2 वर्षांचा मुलगा असे दोन मुलांसह संसाराचा गाडा हाकलत होती. दरम्यान पत्नी लक्ष्मीने काही दिवसांपासून पतीकडे आपल्याला मोबाईल घेऊन देण्याबाबत हट्ट धरला होता. परंतु सध्या पतीकडे पैसे नसल्याने त्याने पत्नीला थांबण्यास सांगितले होते. मात्र ती मोबाईलचा हट्ट बाळगून असल्याने शेवटचे दोन दिवस थांबण्यास सांगितले होते. दरम्यान पतीने तिला मोबाईल घेऊन देण्यासाठी होकार दिला.

    परंतु मोबाईल घेण्यापूर्वीच पत्नीने सायंकाळच्या सुमारास घरीच गळफास घेवून आत्महत्या केली. पती घरी आल्यानंतर घटना त्याच्या लक्षात आली. लगेच त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान पोलिसांनी सदर आत्महत्येबाबत चौकशी सुरू केली असता धक्कादायक कारण पुढे आले. पतीने आपल्या बयानात मोबाईलसाठी पत्नीचा अट्टाहास होता.

    परंतु मोबाईल घेण्यासाठी पैसे उपलब्ध न झाल्याने वेळेवर घेऊन देता आले नाही. मात्र आपण तिला मोबाईल घेऊन देण्याची व्यवस्था केली होती. आपल्या कामाचे पैसे घेऊन आलो होतो; परंतु त्या अगोदरच तिने घरीच स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची कबुली पोलिसांत दिली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.