शिक्षकांना करावी लागतेय १०८ अशैक्षणिक कामे; मुलांना शिकवायचे की अन्य कामे करायची?

जिल्हा परिषद शिक्षकांना विविध सामाजिक जबाबदाऱ्यांसह १०८ अशैक्षणिक कामे करावी लागतात. खिचडी शिजविण्यापासून मुलांना वाटप करण्यापर्यंतची कामे करावी लागत असल्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्यावर देणे गरजेचे आहे.

  चंद्रपूर (Chandrapur).  विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांची असते. मात्र मागील काही दिवसांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. त्यातच जिल्हा परिषद शिक्षकांना विविध सामाजिक जबाबदाऱ्यांसह १०८ अशैक्षणिक कामे करावी लागतात. खिचडी शिजविण्यापासून मुलांना वाटप करण्यापर्यंतची कामे करावी लागत असल्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्यावर देणे गरजेचे आहे.

  कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळांना सुटी आहे. या कालावधीमध्ये ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. मात्र ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क तसेच इतर समस्या असल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहे. काही शिक्षक आपल्या परीने त्यांना शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षकांना विविध अश्रैक्षणिक कामांत गुंतवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष शिकविण्यापेक्षा इतर कामांतच अधिक असते.

  अशा वेळी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करणे चुकीचे ठरत आहे. विशेष म्हणजे, शिक्षकांना मोठ्या प्रमाणात वेतन दिले जाते. कोरोनाकाळात तर त्यांना कामच नाही, त्यांचे वेतन कमी करायला पाहिजे, अशा प्रकारचा समाजातील काही वर्गाचा सूर आहे. असे असले तरी अपवाद सोडला तर काही शिक्षक आपली जबाबदारी नेटाने पूर्ण करीत आहेत; मात्र अशैक्षणिक कामांमुळे तेही आता वैतागले आहेत; त्यामुळे मूळ उद्देशाला बगल दिली जात असल्याचे जाणवत आहे.

  शिक्षकांची कामे
  मतदार याद्या तयार करणे, जनगणना, पटनोंदणी, हत्तीपाय निर्मूलनासाठी सर्वेक्षण, वृक्षारोपण, शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, पालकांची सभा, शाळा व्यवस्थापन समिती सभा, शाळेची ऑनलाईन माहिती भरणे, यू डायसवर माहिती भरणे, शैक्षणिक अहवाल तयार करणे, शिष्यवृत्तीबाबत माहिती भरणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरविणे, शालेय पोषण आहार वाटपाची कामे, पोषण आहारच्या नोंदी ठेवणे, धान्यसाठा नोंदविणे, धान्य, साहित्याची मागणी, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, विद्यार्थ्यांना धान्य वितरण करणे, प्रत्येक राष्ट्रीय कामात मदत करणे, सध्या कोरोनामुळे रस्त्यांवरही शिक्षकांना तपासणीसाठी कामावर लावण्यात आले होते.

  खिचडी शिजवून घेणे; मुलांना वाटप करणे
  सध्या शाळा बंद आहेत; मात्र त्या सुरू झाल्या की, शाळेमध्ये खिचडी शिजवून मुलांना वितरित करण्याचे कामही शिक्षकांनाच करावे लागते. याशिवाय अन्य कामेही आहेत.