वेकोलिने शेतकऱ्यांचा रस्ता मोकळा करावा; राजू झोडे यांची मागणी

वेकोलि कोळसा खाणी लगत परिसरात वर्धा नदीच्या काठालगत अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहेत. सदर शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्याकरिता जुना रस्ता होता. त्या रस्त्यावर वेकोलिने मोठ मोठे मातीचे ढिगारे टाकून शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा रस्ताच बंद केला.

  • मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

बल्लारपूर (Ballarpur).  वेकोलि कोळसा खाणी लगत परिसरात वर्धा नदीच्या काठालगत अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहेत. सदर शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्याकरिता जुना रस्ता होता. त्या रस्त्यावर वेकोलिने मोठ मोठे मातीचे ढिगारे टाकून शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा रस्ताच बंद केल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. सदर रस्ता वेकोलिने तत्काळ मोकळा करावा, अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी नपचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे झाडे असल्यामुळे शेतकरी आपल्या शेतात जाऊ शकत नाही. मागील अनेक वर्षापासून शेतकरी वर्ग या अडचणींचा सामना करीत आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वेकोली प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती. परंतु, वेकोली प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित ठेवले आहे. शेतकरी शेतात जाण्याकरिता या रस्त्याचा वापर करतात. मात्र शेतकऱ्यांना वकोलिचे कर्मचारी दमदाटी करतात.

ही बाब अतिशय गंभीर असून वेकोलि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरीता मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात पीडित शेतकऱ्यांनी मुख्यधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्याकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सदर मागणी तात्काळ पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे. यावेळी राजू झोडे, प्रशांत साळवे, विकी गुप्ता, लक्ष्मण पिसुळे, सातपुते, दिवाकर उंबरे, देवराव पिसुळे, अनिल पिसुळे, वसंत उमरे आदी शेतकरी उपस्थित होते.