पाण्यासाठी महिलांची पायपीट; नळ योजना दहा वर्षांपासून बंद

बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या कोठारीमध्ये उन्हाळा सुरू होताच पाण्याचे संकट ओढावले आहे. गावातील नळयोजना मागील दहा वर्षांपासून बंद आहे.

    बल्लारपूर (Ballarpur).  बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या कोठारीमध्ये उन्हाळा सुरू होताच पाण्याचे संकट ओढावले आहे. गावातील नळयोजना मागील दहा वर्षांपासून बंद आहे. नवीन साडे तीन कोटींची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली. मात्र, गाव तहानलेला असून गावात पाण्याचा ठणठणाट आहे.

    1984 साली गावात जिल्हा परिषदेची नळयोजना आली. मात्र गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेल्याने सदर नळ योजना अपुरी पडत आहे. अशातच गावकारभारी या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहे. गावातील सुरू असलेली नळ योजना तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असून गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षांपासून नळ योजना बंद पडली असून लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावात शेकडो हातपंप आहे. परंतु, हातपंपाला पाणी नाही. अशा स्थितीत साडे तीन कोटीची योजना सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. खनिज विकास निधीतून साडे तीन कोटीची नळ योजना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खेचून आणली. त्याचे कामही पूर्ण झाले. वर्धा नदीचे पाणी शुद्धीकरण करून गावकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचविणे गावाची तहान भागविण्याचा उद्देश यामागे होता.

    ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी त्याची चाचपणी करून योजना ग्रामपंचायतीच्या स्वाधीन करण्यात आली. परंतु, निवडणुकीनंतर नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आली. अडीच वर्षांचा कालखंड लोटला. पण, योजनेचे पाणी घागरीत आलेले नाही. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी येणारच असे आश्वासन सरपंचांनी दिले. पण, आश्वासन फोल ठरल्याचेच दिसून येत आहे.

    नवीन नळ योजनेचे काही काम शिल्लक असून ते पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, योजना अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. सध्या गावात तीव्र पाणी टंचाई असून नळ योजनेचे काम तातडीने करवून वेळेवर ग्रामस्थांना पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून पाण्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केल्या जात आहे. आणखी किती दिवस पाण्यासाठी गावकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.