christmas and corona

जेव्हा आपण परमेश्वराकडे ख्रिसमस बक्षीस(Christmas gift) म्हणून हे कोरोनाचे दिवस दूर करण्याचा आशीर्वाद मागतो, तेव्हा परमेश्वर म्हणतो, “मी कोण आणि काय करणार? तुम्हीच तुमचा नाश करत आहात. ते कारण तुम्हीच दूर करावे.”

– फादर मायकल जी

भरत आपल्या डॅडीला म्हणाला, “डॅडी, तुम्ही मला यंदा ख्रिसमसला(Christmas) लॅपटॉप देणार आहात! मी वाट पाहतोय!”

डॅडी उत्तरले, “अरे, मी तो कधीच आणूनसुद्धा ठेवला आहे! कारण त्या लॅपटॉपसाठी तू मला जे वचन दिलं होतस, ते वचन तू पूर्ण केले आहेस. तू एम. एस. कॉम्प्युटरचा कोर्स ऑनलाईन पूर्ण केलास; सर्टिफिकेटपण मिळवलंस! तुला मी नक्कीच लॅपटॉप बक्षीस देणार!”

भरतने ख्रिसमसच्या बक्षिसाची किंमत मोजली होती. आम्हीदेखील ख्रिस्ताकडून ख्रिसमसचे बक्षीस अपेक्षित करत आहोत. काय पाहिजे आपल्याला ख्रिसमसच्या निमित्ताने? वैयक्तिक गरज नको, कौटुंबिकसुद्धा नको. संपूर्ण मानवजातीसाठी आपण काय बक्षीस मागू या? आपण नक्कीच एका आवाजात म्हणू की आपल्याला या कोरोनाच्या संकटातून परमेश्वराने सोडवावं! ठीक आहे. पण परमेश्वर म्हणतो, “ख्रिसमसचे बक्षीस पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही रास्त किंमत मोजली पाहिजे!” परमेश्वर आपल्याकडून काय किंमत वसूल करणार? किंमत हीच, कोरोनानिर्मितीसाठी आपण कारणीभूत केलेली वस्तुस्थिती आपण दूर करावयाची आहे. धर्माकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर महामारी निर्माण करणारी मानव जातच आणि ती दूर करणारीदेखील मानवजातच, असे मानले पाहिजे.

आपण थोडासा इतिहास पाहू या. कोरोनाव्हायरस २०१९ साली चीन मधल्या हुआन शहरांमधल्या एका प्रयोगशाळेमध्ये सापडला. तो तिकडे कोणी आणला? तो निर्माण केला की तो आणून तिथे जतन करून ठेवला? हे सारे आपल्या मानवाचे प्रश्न आहेत. आणि कोरोना त्या प्रयोगशाळेमधून निसटला की हळूच सोडला? तो जगभर पसरला आणि आज त्याने जगातले लाखो जीव मारून टाकले आहेत! याला सर्वस्वी मानव कारणीभूत आहे. हे मानवाचे उपद्व्याप कशासाठी? अधिक सत्ता मिळावी, सृष्टीची अधिक संपत्ती मिळावी म्हणून.

मित्रांनो आपण गेल्या ४० वर्षांचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की कोरोनासारखे अनेक वायरस आपणच निर्माण केले आहेत किंवा त्यांच्या सुप्तावस्थेतून जागृत केले आहेत, त्यांच्या अभयारण्यातून रिलीज केलेले आहेत. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे एड्स! १९७० च्या सुमारास आपण याबद्दल ऐकू लागलो आहोत. हा व्हायरस कुठे होता आणि कसा तो जगात पसरला याची कथा आज सुप्रसिद्ध आहे. आफ्रिका खंड जवळजवळ पूर्ण जंगलाने आच्छादित आहे. बहुतेक भागांमध्ये हजारो वर्षे माणसाचा प्रवेश झालेला नाही. त्या घनदाट जंगलामध्ये अफाट निसर्ग संपत्ती आहे. अजस्त्र वृक्ष आहेत, आक्राळ विक्राळ नद्या आहेत, बलाढ्य प्राणी आहेत, चित्रविचित्र पशु, पक्षी आणि फळे आहेत. निसर्गाचे काय काय चमत्कार त्या ठिकाणी दडलेले आहेत! त्या चमत्कारांना भुलून युरोपातले लोक आफ्रिकेमध्ये घुसले. त्यांनी तिकडे वसाहती केल्या आणि त्या वसाहतीमध्ये सृष्टीचा सत्यानाश केला.

पुढे १९७० साली युरोपमधला एक छोटासा देश बेल्जियमपण आफ्रिकेमध्ये जाऊन त्याने ‘कांगो बेलज’ नावाची वसाहत केली. त्या ठिकाणी युरोपियन देशांनी एका मोठ्या हायवेची योजना केली. अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत संपूर्ण आफ्रिका खंडाचे दोन भाग होतील, असा अवाढव्य हा हायवे होणार होता. त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि जणू ‘मानवी राक्षस’ त्या जंगलांमध्ये घुसले. त्यांनी झाडे तोडली, दऱ्या सपाट केल्या, डोंगरमाथे छाटून टाकले! इतकेच नव्हे तर अजस्त्र प्राणीदेखील नष्ट केले! आणि त्याच जंगलांमधून व्हायरस निघाला तो एड्सचा! त्या हायवेला नावच पडले आहे ‘एड्स हायवे’! त्या काळात युरोपियन लोक आफ्रिकेत मजेसाठी, सहलीसाठी जात होते. त्यांनी एड्स सोबत आणला आणि जगात पसरला! आज गेल्या काही वर्षांमध्ये लाखो लोक एड्सने मृत्युमुखी पडले आहेत.

दुसऱ्या व्हायरसचे एक उदाहरण घेऊ या. हा ईबोला नावाचा एक विषाणू आहे. त्याच आफ्रिकेमध्ये त्याच हायवेचे बांधकाम जेव्हा इबोला नावाच्या नदीपाशी पोहोचले तेव्हा त्या नदीपरिसरातून हा ईबोला व्हायरस वितरित झाला आणि तो जगात पसरला. ईबोलानेदेखील जगातील लाखो लोकांचे प्राण घेतले आहेत.

विषाणूंना त्यांच्या अभयारण्यातून काढले

आपण थोडासा अधिक खोलात इतिहास पाहिला तर लक्षात येईल सगळे व्हायरस माणसानेच प्रसारित केले आहेत. ते त्यांच्या अभयारण्यात आरामशीर परमेश्वराच्या योजनेनुसार जगत होते. आम्ही त्यांच्या जंगलांमध्ये शिरलो त्यांना डिस्टर्ब केले आणि म्हणून त्यांनी स्वसंरक्षणार्थ आपल्यावर हल्ला केला! हे आक्रमण कुठे येथे थांबणार आहे का? नाही! आता आपण ऐकतो की तिबेटच्या पर्वतावर जिथे सगळी शिखरे हिमाच्छादित आहेत, त्या ठिकाणी चायनाने त्यांच्या बाजूला अनेक संहारक वायरस बर्फामध्ये गुप्तपणे ठेवले आहेत. त्यांची दृष्ट योजना अशी आहे की जेव्हा पृथ्वीचे तापमान वाढेल तेव्हा हे बर्फ वितळतील, त्याच्या हिमनद्या तयार होतील आणि त्या नद्या भारत-चीन यामध्ये वाहू लागतील आणि हे व्हायरस खाली येऊन माणसे मारुन टाकतील! तेव्हा साहाजिकच तोंडून उद्गार निघतात, ‘ हाय परमेश्वरा!’

जेव्हा आपण परमेश्वराकडे ख्रिसमस बक्षीस म्हणून हे कोरोनाचे दिवस दूर करण्याचा आशीर्वाद मागतो, तेव्हा परमेश्वर म्हणतो, “मी कोण आणि काय करणार? तुम्हीच तुमचा नाश करत आहात. ते कारण तुम्हीच दूर करावे.” कशासाठी माणूस निसर्गावर हल्ला करतो आणि निसर्गाची संपत्ती का नष्ट करतो? ही मानवी हाव आहे. भौतिक विकास करण्यासाठी आम्ही निसर्ग भकास करतो. भौतिक विकासाने हरित विकास नष्ट होत आहे. मानवी जीवन खलास होत आहे. अशा परिस्थितीमध्ये एक कोरोना गेला तर दुसरा कोरोना तर नाहीना निर्माण होणार?

त्यामुळे प्रत्येकाने विचार केला पाहिजे की, निसर्ग संवर्धनासाठी मी काय करू शकेन ? व्हायरस त्यांच्या अभयारण्यामध्ये बंदिस्त राहतील आणि माणसाचं जीवन सुरक्षित राहील याचा एकच उपाय आहे तो म्हणजे आपण प्रत्येकाने आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत. आपल्या लक्झरी सोडल्या पाहिजेत, थोडक्यात समाधानी राहायला शिकलं पाहिजे. बातमी आहे की गेल्या वर्षी आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये २३ लाख कारची निर्मिती झाली! त्यामुळे उद्योग मिळाला, पैसे मिळाले हे खरे परंतु याने वाहनांचे प्रदूषण वाढले, त्याचे काय ? प्रदूषणाने आपल्या श्वसनसंस्था दुबळ्या होतात आणि मग हा कोरोना त्या श्वसन संस्थांवर डल्ला मारणार ! म्हणून प्रत्येक व्यक्तीने विचारपूर्वक आपल्या गरजांना मर्यादा घातल्या पाहिजेत. हल्ली सायकलचा वापर वाढला आहे. छान! कोरोनानंतरसुद्धा सायकली चालू ठेवून प्रदूषण कमी करू आणि व्हायरस काबूत ठेवू. केवळ देवाचा आशीर्वाद मागून नव्हे तर प्रत्यक्ष प्रयत्न करून. तरच मित्रांनो, आपल्याला ख्रिसमसला अपेक्षित असलेले बक्षिस मिळेल! चांगले दिवस येतील!!