बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावे ; Donald Trump यांचे आवाहन

अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गाला बळी पडलेल्यांची संख्या अधिक आहे. येथे आतापर्यंत १.५ लाखांहून अधिक जण कोरोनाने दगावले आहेत. अशातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे.

वॉशिंग्टन: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत पण यावर अद्यापही लस उपलब्ध झालेली नाही. प्लाझ्मा थेरपीच्या मदतीने कोरोना रुग्णांवर चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना त्यांनी प्लाझ्मा दान करावे असे आवाहन केले आहे.

अमेरिकन रेड क्रॉस सोसायटीच्या मुख्यालयला डोनाल्ड ट्रम्प यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. “आपल्या प्रशासनाने कोरोना विषाणूवर उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जर आपण कोरोना विषाणूच्या उपचारांतून बरे झाला असाल तर आपले प्लाझ्मा दान करा, यामुळे अनेकांचे जीव वाचतील. आपण सर्वांनी एकत्र येऊन या विषाणूचा नायनाट करूया”

अमेरिकेत कोरोनामुळे आजवर १.५ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू

अमेरिकेत आजवर कोरोनाच्या ४६.२९ लाखांहून अधिक केसेस समोर आल्या आहेत. यात १.५५ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून २२ लाखांहून अधिक जण या संक्रमणातून मुक्त झाले आहेत. अमेरिकेत आताच्या घडीला कोरोनाच्या २१.९७ लाखांहून अधिक ॲक्टिव्ह केसेस आहेत.