गडचिरोलीत सक्रिय कोरोना बाधित १०० पेक्षा कमीच

  • आज ३४ कोरोनामुक्त तर नवीन १७ बाधित

गडचिरोली (जिमाक).  जिल्हयातील सर्व बाधित ५३९ जवान कोरोनामुक्त झाले असून सध्या सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी ९९ आहे. एकूण ८८९ कोरोना बाधितांपैकी एसआरपीएफ, सीआरपीएफ व जिल्हा पोलीस मिळून ५३९ जण कोरोना बाधित झाले होते. त्यापैकी सर्वजण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील बाधितांची आकडेवारी १००च्या आत आली.

जिल्हयातील सामान्य नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे जिल्हयात कोरोना संसर्ग आटोक्यात येत आहे. नागरिकांनी येत्या काळात प्रशासनाला असेच सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. जिल्हयात बाहेरून मोठया संख्येने नागरिक येत आहेत. त्यांना स्थानिक लोकांपासून काही काळ विलग राहणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन त्यांना त्यांच्याच घरात घरातील नातेवाइकांजवळ विलगीकरणात राहण्यासाठी सूचना देत आहे. कोणालाही कोणत्याही कामासाठी प्रवास करण्यासाठी प्रशासन अडवत नाही. नागरिकांनी विहित पद्धतीने प्रशासनाला सहकार्य करून प्रवास करावा आणि आपली माहिती प्रशासनाजवळ द्यावी. जिल्हयात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होवू न देणे हे प्रशासनाचे प्रथम प्राधान्य असेल असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी म्हटले आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८. ७५ टक्के
गडचिरोलीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८. ७५ टक्के आहे. एकूण बाधित ८८९ रुग्णांपैकी ७८९ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सद्या ९९ रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर एकाचा जिल्हयाबाहेर मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने कोरोनाचे उर्वरित रुग्णही लवकरच बरे होतील असे प्रशासनला कळविले आहे.

आज ३४ कोरोनामुक्त तर नवीन १७ बाधित
आज एकूण बाधितांपैकी ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी ९९ झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये गडचिरोली १, अहेरी ८, आरमोरी १, सिरोंचा १, कोरची १, धानोरा २० पोलीस व २ स्थानिक असे २२ जण कोरोनामुक्त झाले.
तर नवीन १७ बाधितांमध्ये चामोर्शी तालुक्यातील १० जण आहेत. यामध्ये चंद्रपूर येथे रुग्णालयात भरती असलेला १ रुग्ण, ३ जण प्रतिबंधात्मक क्षेत्रातील रुग्णांच्या संपर्कात आलेले, १ जण गडचिरोली येथील रुग्णाच्या संपर्कातील व त्याची मुलगी बाधित आढळून आले आहेत, ४ चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील असे चामोर्शीमधील १० जण बाधित मिळाले. आरमोरी मधील गोंदियावरून आलेला १ जण, अहेरी तालुक्यातील ३ जण यामध्ये रूग्णाच्या संपर्कातील २ व आंध्रवरून आलेला १ जण, गडचिरोली सामान्य रुग्णालयातील रुग्णांना सेवा देणारे ३ जण बाधित असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे आज नवीन १७ बाधित आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण कोरोना बाधित ८८९ झाले, कोरोनामुक्त ७८९, तर सध्या सक्रिय ९९ राहिले आहेत.