आयपीएलमध्ये चिअर लिडर्सही नाचणार, प्रेक्षकही दिसणार, फ्रेंचाईजींनी लढवली शक्कल

मोकळ्या मैदानात होणाऱ्या लढतीत खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी चिअर लिडर्स आणि प्रेक्षकांची खास तजबीज केली जाणार आहे. संघमालक मोकळ्या मैदानात अतिरिक्त स्क्रीनची व्यवस्था करणार असून यावर प्रेक्षकांच्या रेकॉर्ड केलेल्या भावमुद्रा आणि चिअर लिडर्स यांचे व्हिडिओ दाखवले जातील.

अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगचा ( IPL) १३ वा हंगाम यंदा संयुक्त अमिरात (युएई) मध्ये खेळला जाणार आहे. भारतामधील वाढत्या कोरोना ( संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला. १९ सप्टेंबरला चेन्नई सुपर किंग्ज आणि गत विजेत्या मुंबई इंडियन्स (csk vs mi) संघात पहिला सामना रंगणार आहे. १० नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. मात्र दर्शकांविना होणाऱ्या या स्पर्धेचा माहोल बनवण्यासाठी आयपीएल संघमालकांनी नामी शक्कल लढवली आहे.

मोकळ्या मैदानात होणाऱ्या लढतीत खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी चिअर लिडर्स आणि प्रेक्षकांची खास तजबीज केली जाणार आहे. संघमालक मोकळ्या मैदानात अतिरिक्त स्क्रीनची व्यवस्था करणार असून यावर प्रेक्षकांच्या रेकॉर्ड केलेल्या भावमुद्रा आणि चिअर लिडर्स (Cheerleaders ) यांचे व्हिडिओ दाखवले जातील. अर्थात विकेट पडल्यावर, चौकार-षटकार खेचल्यावर टीव्ही स्क्रीनवर चिअर लिडर्स नाचताना दिसतील.

संघमालकांनी लढवलेली ही शक्कल खेळाडूंनाही आवडली आहे. सनरायझर्स हैद्राबाद संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यावर प्रतिक्रिया दिली असून यामुळे निश्चितच खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल असे म्हटले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण मैदान मोकळे ठेवले जाणार आहे. यामुळे अनेक संघमालकांनी चिअर लिडर्स छोटे-छोटे व्हीडिओ आधीच तयार ठेवले आहे. त्या-त्या संघाच्या मैदानावरील लढतीदरम्यान हे व्हीडिओ चौकार, षटकार मारल्यावर चालवले जातील. यामुळे खेळाडूंना आपण मोकळ्या मैदानात खेळतोय असे वाटणार नाही. आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल, व खेळही रोमांचित होईल.