लाइव्ह दरम्यान जातीवाचक आक्षेपार्ह शब्द वापरल्याने युवराज सिंग विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल

दिल्ली: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा कायम चर्चेत असतो. कधी त्याने केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे, तर कधी त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये युवराज सोशल मीडियावर

 दिल्ली: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा कायम चर्चेत असतो. कधी त्याने केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे, तर कधी त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये युवराज सोशल मीडियावर अनेकदा लाइव्ह आला. पण रोहित शर्मासोबत लाइव्ह येणे त्याला महागात पडले. रोहित शर्मासोबत लाइव्ह चॅटदरम्यान युवराज सिंगने जातीवाचक आक्षेपार्ह शब्द उच्चारला. त्या शब्दामुळे एका ठराविक समाजाचा अपमान झाल्याचे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे ट्विटरवर युवराज सिग माफी मांगो हा हॅशटॅग ट्रेंड झाला. युवराज सिंगने माफी मागावी, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली. त्यातच युवराज विरूद्ध या प्रकरणी पोलिसात तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, दलित समाजातील मानवाधिकार कार्यकर्ते अॅडव्होकेट रजत कळसन यांनी युवराज विरोधात हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील हंसी गावात तक्रार दाखल केली आहे. कळसन यांनी तक्रार दाखल केल्यावर रोहितवरही निशाणा साधला आहे. युवराजने केलेल्या बेजबाबदार वक्तव्यावर रोहितने विरोध दर्शवायला हवा होता, परंतु तो हसला आणि त्यावर सहमत असल्याचे दर्शवले. अशा शब्दात कळसन यांनी रोहितवरही निशाणा साधला. याशिवाय, पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर युवराजच्या अटकेचीही त्यांनी मागणी केली. तसेच प्रकरणाचे रेकॉर्डींग असलेली सीडी आणि कागदपत्रेही पोलिसांच्या ताब्यात दिली जातील, असेही त्यांनी सांगितले. लाइव्ह सत्रादरम्यान युवीने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना भंगी असे संबोधले युवराजच्या या शब्दाचा अयोग्य वापर झाल्यावर अनेक यूजर्सनी युवीवर टीका केली. त्यानंतरच नेटकऱ्यांनी युवराजला धारेवर धरत युवराज सिंग माफी मांगो अशी मागणी ट्विटरवरून केली होती.