तिसरा कसोटी सामना वाचवल्याने हनुमा विहारी आणि अश्विन होतोय कौतुकाचा वर्षाव

विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करत सामना वाचवला. विहारी-अश्विन यांनी सहाव्या गड्यासाठी २५९ चेंडूत ६२ धावांची भागिदारी केली.

भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना वाचवल्याने भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुखापतीनंतर योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरून हनुमा विहारी आणि अश्विन यांनी तब्बल २५९ चेंडू खेळून काढत तिसरी कसोटी अनिर्णीत राखत, बॉर्डर गावसकर मालिका १-१ बरोबरीत सोडली आहे. विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करत सामना वाचवला. विहारी-अश्विन यांनी सहाव्या गड्यासाठी २५९ चेंडूत ६२ धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघानं पाच गड्यांच्या मोबदल्यात ३३४ धावापर्यंत मजल मारली.

पण १५ जानेवारीपासून चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघापुढे मोठी आव्हाने असतील, असे पाहायला मिळत आहे. भारतीय संघाला सर्वात जास्त चिंता असेल ती दुखापतींची. कारण भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला गंभीर दुखापत झाली असून तो चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याची उणीव नक्कीच भारतीय संघाला भासणार आहे. पण त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचे, हा महत्वाचा निर्णय भारतीय संघाला घ्यावा लागणार आहे. साधारणत: एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आणि तो पुढचा सामना खेळणार नसेल तर बदली खेळाडू मायदेशातून पाठवला जातो. पण करोनामुळे त्याला १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. त्यामुळे भारताला आता अतिरीक्त खेळाडू मिळणार नाही.

या सामन्यात रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांनाही दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण या दोघांनीही दुखापतीनंतर फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. पण या फलंदाजीनंतर त्यांची दुखापत अजून बळावली आहे की नाही, ही गोष्टदेखील भारतीय संघाला पाहावी लागणार आहे. कारण त्यांची दुखापत जर बळावली गेली असेल तर त्यांना चौथ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही आणि भारतीय संघाची चिंता अजून वाढू शकते.