IPL2020: राजस्थान रॉयल्सची ऐतिहासिक कामगिरी ; किंग्ज इलेव्हन पंजाबच्या तोंडाशी आलेला घास पळवित मिळवला विजय

IPL2020 मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघांमधला सामना चांगलाच रंगला. पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करत राजस्थानसमोर २२४ धावांचं आव्हान उभं केलं.मयांक अग्रवालचं शतक आणि लोकेश राहुलचं अर्धशतक हे पंजाबच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. इतके तगंडे आव्हान पेलण्यासाठी राजस्थानच्या संघानेही आक्रमक सुरुवात केली.राजस्थान रॉयल्सने ऐतिहासिक कामगिरी करत आयपीएलमध्ये मोठ्या लक्ष्याचा पहिल्यांदाच यशस्वीपणे पाठलाग करत ४ विकेटने सामना जिंकला.

राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल जोडीने शारजाच्या मैदानात फटकेबाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये पंजाबच्या सलामीवीरांनी ६० धावा करत विक्रमाची नोंद केली. आयपीएलच्या तेराव्या हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पंजाबने आपल्या नावावर केला. २२४ धावांचं आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या राजस्थाननेही धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीर जोस बटलर स्वस्तात माघारी परतल्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन जोडीने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला.