IPL 2020 : मुंबईचा पंजाबवर ४८ धावांनी दणदणीत विजय

इंडियन प्रीमिअर लीगच्या १३ व्या सामन्यात आज किंग्स इलेव्हन पंजाब विरोधात मुंबई इंडियन्सने ४८ धावांनी दणदणीत विजय मिळविला.सामन्यात प्रथम फलंदाजी करत मुंबईच्या संघाने धावांचा पाऊस करत २० षटकात १९१ धावा केल्या. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना पंजाबचा संघ २० षटकात ८ बाद १४३ धावाच करू शकला.

अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माने ७० धावांची खेळी केली. तर पांड्या ११ चेंडूत नाबाद ३० धावा आणि पोलार्ड २० चेंडूत नाबाद ४७ धाव करत पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि जेम्स पॅटिन्सन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेत मुंबईला विजय मिळवून दिला.

१९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची खराब सुरूवात झाली. मयंक अग्रवाल २५ धावा करून तर नायर शून्यावर बाद झाला. केएल राहुल १७ धावांवर आउट झाला. निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी चांगली भागिदारी करण्याचा प्रयत्न केला मात्र तोही अपयशी करण्यात मुंबई गोलंदाजांना यश आले. दमदार फटकेबाजी करणारा पूरनने २७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४४ धावा केल्या. पाठोपाठ मॅक्सवेलही मोठा फटका मारताना ११ धावांवर माघारी परतला. कृष्णप्पा गौतमने थोडीफार फटकेबाजी केली पण अखेर पंजाबला पराभवाला सामोरं जावं लागलं.