IPL 2020 : राहुलच्या दमदार शतकाने RCB चा धुव्वा ; पंजाबचा ९७ धावांनी विजय

आयपीएल २०२० चा सहावा सामना दुबईमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगला. बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने यंदाच्या मोसमातील पहिलं दमदार शतक झळकावीत नाबाद १३२ धावांची खेळी केली आणि विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला २०७ धावांचे तगडे आव्हान दिले. हे आव्हान बंगळुरूला पेलता आले नाही आणि त्यांचा डाव अवघ्या १०९ धावांत आटोपला.

 

नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाब संघाला मयंक अग्रवाल आणि राहुलने फलंदाजीची चांगली सुरुवात करून दिली. सामन्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये फोर मारत राहुलने २००० रन पूर्ण केले . असं करणारा तो २० वा भारतीय खेळाडू ठरला आहे. केएल राहुलने ६९ सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.तर मयंक अग्रवाल २० चेंडूत २६ धावा काढून बाद झाला. निकोलस पूरन १७ तर ग्लेन मॅक्सवेलने ५ धावा करून बाद झाले. पण कर्णधार राहुल मात्र एकाकी बाजू सांभाळत खेळत राहिला. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला त्याने फटके मारले. त्यातच विराट कोहलीने तब्बल दोनदा त्याचा झेल सोडले त्याचा फायदा घेत राहुलने दमदार शतक ठोकलं. त्याने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. त्यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.

पंजाब संघाच्या आव्हानाचा डोंगर बंगळुरूच्या संघाला चढता आला नाही. त्यांचा संघ अवघ्या १०९ धावांवरच माघारी परतला. संघातील देवदत्त पडीक एक धाव काढून माघारी परतला. त्या पाठोपाठ जोशुआ फिलीप (०), विराट कोहली (१) हे दोघेही लगेच बाद झाले.त्यानंतर फिंच २० धावांवर तर डीव्हिलियर्स २८ धावांवर माघारी परतला. मुरगन अश्विन, रवी बिश्नोईची फिरकी प्रभावी ठरल्याने बंगळुरू संघाचा धुव्वा उडाला. वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. अखेर १७ व्या षटकातच बंगळुरूचा संघ १०९ धावांत माघारी परतला.