टी-२० वर्ल्डकप स्पर्धा न्यूझीलंडमध्ये घ्यावी : डीन जोन्स

सिडनी: न्यूझीलंडने कोविड १९ महामारीवर नियंत्रण मिळविले असून तेथील परिस्थिती सर्वसामान्य होत असल्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन न्यूझीलंडमध्ये केले जाऊ शकते, असा विचार ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज व

सिडनी: न्यूझीलंडने कोविड १९ महामारीवर नियंत्रण मिळविले असून तेथील परिस्थिती सर्वसामान्य होत असल्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन न्यूझीलंडमध्ये केले जाऊ शकते, असा विचार ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज व टीव्ही समालोचक डीन जोन्स यांनी मांडला आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार असून महामारीमुळे त्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असल्याने त्यांनी हा पर्याय सुचविला आहे. मागील बारा दिवसांत न्यूझीलंडमध्ये कोरोनाची लागण झालेला एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. सध्या त्यांच्याकडे फक्त एक पॉझिटिव्ह रुग्ण आहे. कोरोनाविरुद्धच्या लढय़ासाठी सज्ज करण्यात आलेली यंत्रणा ऍलर्ट लेव्हल १ वर आणण्याची गरज आहे का, याचा आढावा घेण्यासाठी येत्या सोमवारी न्यूझीलंड कॅबिनेटची बैठक होणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध निर्बंध घालण्यात आले होते. हे निर्बंध हटविण्याचा निर्णय झाल्यास मोठे सामूहिक कार्यक्रम करण्यास परवानगी मिळणार आहे. आयसीसीने यावर अद्याप निर्णय घेतलेला नसून १० जून रोजी होणाऱ्या बैठकीत ते निर्णय घेण्याची शक्यता आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा आयोजित करण्याची शक्यता जोन्स यांनी याआधीच फेटाळून लावली आहे.