टीम इंडियाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह ; पाचव्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात

भारतीय संघाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. जर मँचेस्टर कसोटी अनिर्णित राहिली किंवा टीम इंडिया जिंकण्यात यशस्वी झाली तर २००७ नंतर भारत इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकेल

    नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंडमधील (India vs England) पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी सर्वात दिलासादायक बातमी हाती आली आहे. या पाचव्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची करण्यात आलेली कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह (corona test report negative) आला आहे. काल गुरुवारी घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत सर्व खेळाडू निगेटिव्ह आढळले आहेत.

    भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आजपासून मँचेस्टर येथे सुरु होत आहे. मात्र चौथ्या सामन्यानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने पाचवी टेस्ट खेळवण्याबाबतही शंका व्यक्त केली जात होती. मात्र आता सर्व खेळाडूंचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे पाचवा कसोटी सामना ठरलेल्या वेळेत सुरु होणार आहे.

    भारतीय संघाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. जर मँचेस्टर कसोटी अनिर्णित राहिली किंवा टीम इंडिया जिंकण्यात यशस्वी झाली तर २००७ नंतर भारत इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकेल. यापूर्वी, भारताने इंग्लंडच्या मैदानावर १९७१ मध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत १-० , १९८६ मध्ये तीन सामन्यांची मालिका २-० आणि २००७ मध्ये तीन सामन्यांची मालिका १-० ने जिंकली होती.