कसोटीत सर्वात युवा विकेटकीपर बनलेल्या क्रिकेटपटूने जाहीर केली निवृत्ती

टीम इंडियाचा माजी विकेटकिपर आणि फलंदाज पार्थिव पटेलनं वयाच्या ३५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय तसेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पार्थिव पटेलनं २०१८ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. २००२ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी पार्थिव पटेलनं टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत विकेटकिपर बनला.

टीम इंडियाचा माजी विकेटकिपर आणि फलंदाज पार्थिव पटेलनं वयाच्या ३५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय तसेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पार्थिव पटेलनं २०१८ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. २००२ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी पार्थिव पटेलनं टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत विकेटकिपर बनला. पार्थिव पटेल या वर्षी आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघामध्ये होता. परंतु, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

पार्थिव पटेलनं ट्विटरवर ट्वीट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. पार्थिव पटेलंनं लिहिलं की, “मी आज माझ्या १८ वर्षांच्या क्रिकेट करिअरला अलविदा करत आहे. बीसीसीआयने माझ्यावर विश्वास दाखवत वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मला दिली. बीसीसीआयने ज्याप्रकारे माझी साथ दिली, त्यासाठी नेहमीच आभारी राहिल.”

सौरव गांगुलीचे आभार

माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे त्याने खासकरुन आभार मानले असून पार्थिव म्हणाला की, “दादांचा मी नेहमीच आभारी असीन. एक कर्णधार म्हणून गांगुली नेहमीचं माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्यासोबत टीम इंडियासाठी खेळणं हे माझं सौभाग्य होतं.” तसेच पार्थिव ज्या कर्णधारांच्या नेतृत्त्वात टीम इंडियासाठी खेळला होता, त्या सर्व टीम इंडियाच्या कर्णधारांचे पार्थिव पटेलनं आभार मानले आहेत.

१७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

पार्थिव पटेलच्या नावावर टीम इंडियासाठी विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून सर्वात कमी वयात डेब्यू करण्याचा रेकॉर्ड आहे. पार्थिव पटेलनं टीम इंडियासाठी २५ कसोटी सामने खेळले असून ३१.१३ च्या सरासरीने ९३४ धावा केल्या आहेत. तसेच आतापर्यंत त्याने ६ अर्धशतकं फटकावली आहेत.