
मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये 48 तासांपासून हिंसाचार झालेला नाही.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार (Manipur Violence) भडकण्याची शक्यता आहे. त्याच कारण म्हणजे, आज सकाळी सकाळी मणिपुरमधील कांगपोकपी जिल्ह्यातील कुकी गावात एका वृद्ध महिलेसह तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर पोलिस आणि आयआरबी (इंडिया रिझर्व्ह बटालियन) च्या गणवेशात होते, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सशस्त्र लोक आले आणि सुमारे दोन तास गावात थांबून त्यांनी गोळीबार केला, असा स्थानिकांचा आरोप आहे. पोलिसांनी तीन जण ठार आणि दोन जखमी झाल्याची पुष्टी केली असली तरी त्यांनी या घटनेबाबत अधिक काही सांगितले नाही.
खोकेन हे कांगपोकपी जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. इंफाळ पश्चिम जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या संगाईथेलपासून हे गाव फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, खोकेन येथील रहिवाशांनी 65 वर्षीय डोमखोहोई, 52 वर्षीय खैजामांग गुईटे आणि 40 वर्षीय जंगपाओ तौथांग अशी तीन मृतांची ओळख पटवली आहे. गावातील रहिवासी आणि डोमखोईचा धाकटा भाऊ थोंगखुप डोंगल यांनी सांगितले की, पहाटे सुमारे 40 लोक गावात दाखल झाले होते. “ते आरामबाई टेंगोलचे सदस्य होते आणि त्यांनी पोलिस आणि आयआरबीचा गणवेश घातलेला होता. त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुमारे दोन तास गोळीबार सुरू होता. आम्ही गाव रिकामे केले आणि जवळच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये जाऊन त्यांना माहिती दिली.
सीआरपीएफ आणि गोरखा रेजिमेंट गावात दाखल झाल्यानंतरच हल्लेखोर बाहेर आले. ते पाच जिप्सीमध्ये आले. डोमखोई गावातील चर्चमध्ये ती प्रार्थनेसाठी गेली होती. कुटुंबीय म्हणाले, “दोन्ही पुरुष साधे शेतकरी होते. माझी बहीण विधवा होती.” इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) ने असा आरोप केला आहे की लष्कराच्या गणवेशात खोऱ्यातील बंडखोरांनी हा हल्ला केला होता. या घटनेच्या प्रत्युत्तरात आदिवासी एकीकरण सदर हिल्स समितीने पुन्हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.