धक्कादायक! शाळेच्या छतावर 4 नवजात अर्भकांचे आढळले मृतदेह, अकोल्यात एकच खळबळ

अकोल्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छतावर नवजात अर्भकाचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  अकोला : अकोल्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अकोल्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छतावर काही नवजात अर्भकाचे मृतदेह आढळून आले आहे. खेळता खेळता काही मुलं शाळेच्या छतावर गेले तेव्हा त्यांना एका पॅालिथीनमध्ये त्यांना मृतदेह आढळले. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  नेमकं प्रकरण काय?

  मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौकात जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला आहे.  या शाळेच्या मैदानाजवळ काही मुलं क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता त्यांचा बॉल शाळेच्या छतावर गेला. काही मुलं बॉल आणण्यासाठी तिथे गेली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला.
  जेव्हा मुले बॉल गोळा करण्यासाठी  छतावर गेली तेव्हा त्यांना एक पॅलिथीन दिसलं. पॅालिथीन उघडून पाहिलं तेव्हा मला त्यात नवजात बालकांचे मृतदेह आढळले. यानंतर मुलांनी 112 क्रमांकावर फोन करून या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून माहिती घेतली

  “वैद्यकीय अहवालानंतर पुढील गोष्टींचा खुलासा होईल”

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “जिल्हा परिषद शाळेल्या आवारात एक अर्भक आढळून आलं आहे आणि त्याच्या बाजूला मांसाचे तीन भाग आढळून आले आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील गोष्टींचा खुलासा होईल.” दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आवारात चार अर्भकांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली होती. परंतु, पोलिसांनी सांगितल्यानुसार, एकच मृतदेह  असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.