चाळीसगावात तीन दिवसापुर्वी भाजपच्या माजी नगरसेवकावर कार्यालयात गोळीबार, आज उपचारादरम्यान मृत्यू!

भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर चाळीसगाव येथील कार्यालयात घुसून पाच जणांनी गोळीबार केला होता. त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांचा मृत्यू झाला.

    गेल्या काही दिवसापासून राज्यात राजकीय राजकीय नेत्यांवर गोळीबार होण्याचं सत्र सुरू आहे. दोन-चार दिवसापुर्वी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. महेश गायकवाड यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, गुरुवारी दहीसर येथे ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने कार्यालयात गोळीबार केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता जळगाव मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. तीन दिवसापुर्वी भाजपाचे माजी नगरसेवक बाळू मोरे (Balu More Firing Case) यांच्यावर चाळीसगाव येथील कार्यालयात घुसून पाच जणांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात ते गंभीर झाले होते. नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

    तीन दिवसापुर्वी कार्यालयात घुसून केला होता गोळीबार

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील चाळीसगाव येथील भाजपचे माजी नगरसेवक बाळु मोरे यांच्यावर तीन दिवसापुर्वी त्यांच्या कार्यलयात घुसून गोळीबार करण्यात आला होता. अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर अंधाधुद गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

    घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

    चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी येथील कार्यालयात ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना चेहऱ्यावर मास्क लाऊन आलेल्या पाच अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता,  ही संपूर्ण घटना  CCTV कॅमेरात कैद झाली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेच तपासत असून कारवाई करत आहेत.