
ज्येष्ठाची जागा बळकावण्याचा प्रयत्न, जेसीबीने कंपाऊंडच तोडले; बिल्डरासह चौघांवर गुन्हा दाखल
पुणे : गुलटेकडी सारख्या उच्चभ्रू भागातील रहिवासी ज्येष्ठ नागरिकाच्या घराचा (जागेचा) ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात आता मार्केटयार्डातील बिल्डरासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जागा घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर जेसेबी घेऊन गेला. त्याने कंपाऊंड देखील पाडले. पण, पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर ताबा घेण्याचा प्रयत्न पुर्ण झाला नाही.
तत्पुर्वी यापुर्वीही जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा काही वरिष्ठ पोलिस अधिकारी याठिकाणी उपस्थित असल्याची माहिती आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच बिल्डराकडून पाडलेले कंपाऊंड पुन्हा बांधून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात बिल्डर, दांडेकर पुलावरील कॉन्ट्रॅक्टर, जेसीबीचा चालक यांच्यासह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गुलटेकडी येथील टीएमव्ही कॉलनीत संबंधित तक्रारदार यांचा दोन मजली बंगला आहे. या जागेचा व्यवहार संबंधित बिल्डर सोबत झालेला आहे. तक्रारदारांनी घर सोडण्यासाठी काही दिवस मुदत देण्याची विनंती केली होती. त्यानंतर स्वत: हून घर खाली करू असे सांगितले होते. काही दिवस देण्यातही आले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून वारंवार घर खाली करण्यास सांगितले जात होते.
ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद
परंतु, त्यांनी ते सोडले नव्हते. व्यवहारानुसार बिल्डारांनी न्यायालयाची परवानगी आणून ही जागा रिकामी करणे अपेक्षित होते. पण, तसे न करता तसेच तक्रारदार यांना पुर्वसुचना न देता कॉन्ट्रॅक्टरला सांगून जेसीबी पाठवून ताबा घेण्याचा प्रयत्न केला. जेसीबीने त्यांच्या बंगल्याला असलेला कंपाऊंडची भिंत पाडण्यास सुरूवात केली. तेव्हा तक्रारदार कुटूंबासह पोलिसांकडे धावले. नंतर पोलिसांनी कोर्टाची परवानगी न घेता जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.