अग्निवीर भरतीसाठी घरुन निघाला आणि त्याचा जीव गेला..आईचा टाहो! पोलिसांनी बनावट चकमकीत मारल्याचा केला आरोप

आकाशच्या मृत्यूबाबत पोलिसांचा दावा आहे की, घटनेच्या दिवशी तो वाळू माफियांसाठी ट्रॅक्टर चालवत होता. त्याचवेळी आकाशच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्याला ट्रॅक्टर कसा चालवायचा हे माहित नव्हते

मुरैना : मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात तरुणाच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं आहे. हा तरुण अग्निवीर भरतीसाठी आग्रा येथे गेला होता. तेथे पोलीस चकमकीत त्याचा मृत्यू ( police encounter) झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याला बनावट चकमकीत पोलिसांनी ठार मारल्याचा आरोप आता तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील गदौरा येथे राहणारा आकाश गुर्जर आग्रा येथे त्याच्या चुलत भावाकडे गेला होता. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. आता त्याच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

पोलिसांच्या चकमकीत मृत्यू

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, आग्रा येथील पोलीस वाळू माफियांविरोधात कारवाई करत होते. दरम्यान, चकमकीत आकाशला गोळी लागली. गोळी लागल्याने आकाश गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे 48 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी बनावट चकमकीत मारले –  कुटुंबीयांचा आरोप

आकाशच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तो २६ सप्टेंबर २०२२ रोजी बसने आग्राला जात होता. सकाळी साडेसहा वाजता ते आग्राच्या आधी कुर्रा तिराहेजवळ लघुशंकेसाठी उतरला. त्यानंतर काही पोलिस सिव्हिल ड्रेसमध्ये आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. वृत्तानुसार, आकाशला तीन गोळ्या लागल्या आहेत. दोन त्याच्या मांडीत आणि एक पोटात होते. त्यानंतर त्यांना लखनौ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 48 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर आकाशचा मृत्यू झाला.  मात्र, या प्रकरणी आकाशच्या आईने पोलिसांवर आरोप केला आहे. आकाशच्या आईने ही चकमक बनावट असल्याचे म्हटले आहे. तसेच घटनेच्या चौकशीची मागणी केली.

आकाशच्या मृत्यूबाबत पोलिसांचा दावा आहे की, घटनेच्या दिवशी तो वाळू माफियांसाठी ट्रॅक्टर चालवत होता. त्याचवेळी आकाशच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्याला ट्रॅक्टर कसा चालवायचा हे माहित नव्हते. येथे, आकाश ज्या बसने आग्रा येथे आला होता त्या बसच्या चालकानेही आकाश मुरैनाहून आग्राला आला होता, असे  सांगितले. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.