महिला तहसिलदारावर कार्यालयातच प्राणघातक हल्ला; आरोपी भावाला अटक

बीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आशा वाघ असे जखमी नायब तहसीलदारांचे नाव आहे. विशेष म्हणजे आशा वाघ यांच्या सख्ख्या भावानेच हा हल्ला केल्याची माहिती आहे(A woman tehsildar was attacked by her brother in the office).

    बीड : बीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आशा वाघ असे जखमी नायब तहसीलदारांचे नाव आहे. विशेष म्हणजे आशा वाघ यांच्या सख्ख्या भावानेच हा हल्ला केल्याची माहिती आहे(A woman tehsildar was attacked by her brother in the office).

    मिळालेल्या माहितीनुसार, आशा वाघ या नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयात आस्थापना शाखेत बसलेल्या असताना त्यांचा सख्खा भाऊ तिथे दाखल झाला आणि अचानक धारदार कोयत्याने हल्ला चढवत आशा वाघ यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

    यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने हल्लेखोर भावाला रूममध्ये कोंडून पोलिसांना याबाबत माहिती दिली.
    तहसीलदार आशा वाघ यांच्यावर मोठ्या प्रमाणात वार झाल्याने त्या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

    वाघ यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. हा सर्व प्रकार संपत्तीच्या वादातून घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हल्लेखोराला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे.