मुंबई सत्र न्यायालय परिसरातून केली फरार आरोपी शहिम अहमदला अटक

अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हेची हत्या केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपी शहिम अहमद याला बुधवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या परिसरातून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

    मुंबई: नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश‍कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आल्यानंतर सात जणांना अटक करण्यात आली होती.

    त्यातच एनआयएकडून मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज या दोघांना अटक केली होती. तर आरोपी शहिम अहमदला फरार म्हणून घोषित करण्यात आले होते. एनआयएकडून शहिमवर दोन लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यातच बुधवारी अहमदला मुंबई सत्र न्यायालय परिसरातून एनआयएने अटक केली. अहमद स्वत: न्यायालयात शरण आला होता. मात्र, तो शरण येण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच एनआयएकडून त्याला अटक कऱण्यात आली. शहिमला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.