श्रद्धाच्या हत्येचा गुन्हा सहज कबुल करण्यामागेही आहे आफताबचा मास्टरप्लॅन

पोलिसांच्या संशयानुसार आफताब श्रद्धाला घेऊन फिरायला गेला होता तेव्हा त्याला तिथेच श्रद्धाला मारायचं होत पण त्याला तिथे तस करता आलं नाही. त्यानंतर तो दिल्लीमध्ये श्रद्धाला घेऊन जातो आणि घर घेण्याआधी आजूबाजूच्या परिसराची रेकी करतो.

  दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने अवघा देश हादरून गेला आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब पुनावाला याने तिचा निर्दयीपणे खून करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून तिच्या शवाची विल्हेवाट लावली. मात्र या हत्येचा गुन्हा समोर आल्यावर पोलिसांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आफताबने पोलिसांसमोर हत्येचा गुन्हा कबुल करून अनेक धक्कादायक खुलासे केले. मात्र आफताब पुनावाला याचा हत्येचा गुन्हा सहज कबुल करण्यामागेही एक मोठे षडयंत्र असल्याचा संशय पोलिसांना आहे.

  नियमांनुसार आणि याच्याआधी घडलेल्या घटनांच्या निकालावरून स्वतःहून हत्येची कबुली दिली तर अनेकदा आरोपीला कमी शिक्षा देण्यात येते. पण तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की जर अपराध हा अपराध असतो मग शिक्षेत कमी-जास्तपणा का येतो? तर जाणून घेऊयात.

  आफताबने गुन्ह्याची कबुली देताना सांगितलं की, हो मी रागामध्ये श्रद्धाचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाला. आफताबने हा गुन्हा जाणूनबुजून नाहीतर रागात असताना केला आहे. याचं एक उदाहरण म्हणजे, भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांची एका तरूणासोबत भांडण झाली होतीत, यादरम्यान त्यांनी तरूणाच्या नाकावर बुक्की मारली. संबंधित तरूणाचा रूग्णालयामध्ये उपचारादरम्यान झटक्याने मृत्यू होतो. या गुन्ह्यामुळे सिद्धू यांना केवळ एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

  सांगण्याचं तात्पर्य हे की, कोणतीही हत्या तुम्ही जाणीवपूर्वक किंवा त्याआधी कोणतीही योजना आखून केली नाही. मात्र तुमच्याकडून स्वत:ला वाचवताना किंवा तुमच्याकडून अपघाती मृत्यू झाला तर तुम्हाला कमी शिक्षा होते. हो पण तेच जर नियोजनपूर्व कट आखून हत्या केली असेल तर त्यासाठी जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकते. आफताब पूनावाला कायद्याचा आधार घेत स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कारण आफताबने पोलिसांना सांगितलं की मी श्रद्धाचा रागाच्या भरात गळा दाबला आणि तिला संपवलं. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचं तो सांगत असला तरी त्याने श्रद्धाची हत्या नियोजितपूर्व केली आहे.

  पोलिसांच्या संशयानुसार आफताब श्रद्धाला घेऊन फिरायला गेला होता तेव्हा त्याला तिथेच श्रद्धाला मारायचं होत पण त्याला तिथे तस करता आलं नाही. त्यानंतर तो दिल्लीमध्ये श्रद्धाला घेऊन जातो आणि घर घेण्याआधी आजूबाजूच्या परिसराची रेकी करतो. आफताब शांत डोक्याने श्रद्धाला संपवण्याचा कट करत होता. शेवटी घर घेतल्यावर त्याने दोन-तीन दिवसांमध्येच श्रद्धाला संपवलं. मात्र आता सहजपणे आपला गुन्हा कबूल करत रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं सांगत आहे.

  दरम्यान, पोलिसही आता कोर्टात आफताबने हा गुन्हा रागात नाहीतर कट आखून केल्याचं दाखवण्यासाठी पुरावे जमा करत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आफताब जेव्हा श्रद्धाचे तुकडे टाकायला जायचा त्यावेळी फोन घरी ठेवून जायचा. त्याला माहित होतं की गुन्हा समोर आल्यावर पोलीस त्या त्या दिवसांचं लोकेशन ट्रेस करत सर्व तुकडे जमा करतील. आफताब शिकला-सवरलेला होता त्यामुळे त्याने कायद्यांची माहिती घेतली होती. आता त्याचाच वापर करत तो स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.