आफताबच्या नार्को टेस्टला सुरुवात, ‘हे’ प्रश्न विचारले जाणार

आज होणाऱ्या नार्को टेस्ट मधून श्रद्धा हत्याकांड प्रकरणाविषयी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिस आफताबला आंबेडकर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. तेथेच त्याची नार्को टेस्ट होणार असून ही चाचणी 2 ते 3 तासात पूर्ण होते.

    दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आता आरोपी आफताब पुनावाला याच्या नार्को टेस्टला सुरुवात झाली आहे. सकाळी १० च्या सुमारास आफताबची नार्को चाचणी सुरु करण्यात आली असून या चाचणीतून श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.

    श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाने अवघा देश हादरून गेला आहे. या प्रकरणी नवनवीन खुलासे रोज समोर येत असून यातून हे हत्याकांडाचे गूढ उलकू लागले आहे. आरोपी आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे दिल्ली येथील जंगलात फेकून दिले. ६ महिन्यांनी या हत्येचा छडा पोलिसांना लागला. आज होणाऱ्या नार्को टेस्ट मधून श्रद्धा हत्याकांड प्रकरणाविषयी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिस आफताबला आंबेडकर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. तेथेच त्याची नार्को टेस्ट होणार असून ही चाचणी 2 ते 3 तासात पूर्ण होते.

    अनेक गुढ प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी दिल्ली पोलिसांना पूर्ण तयारी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रश्नांमध्ये कट कसा आखला, मोबाइल डेटामध्ये काय आहे, मोबाइलमधून कोणते पुरावे हटवले गेले, दोघांमधील संबंध किती खोलवर होते, कोणती शस्त्रे वापरली गेली, शस्त्र फेकण्याचे ठिकाण, हेतू काय होता? हत्येमागे तारीख, खुनाचा पुरावा, त्याच्या अॅपचा तपशील, आफताबच्या नवीन मित्राची माहिती असे अनेक प्रश्न आहेत.

    नार्को टेस्ट म्हणजे काय ?

    आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी नार्को टेस्ट केली जाते. ही चाचणी फॉरेन्सिक तज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ इत्यादींच्या उपस्थितीत केली जाते. या चाचणीत आरोपीला काही औषधे दिली जातात, ज्यामुळे त्याचे जागृत मन सुस्त अवस्थेत जातं. त्यामुळे आरोपीच्या कानावर पडणाऱ्या गोष्टींविषयी विचार करुन उत्तर देण्याचे त्याचे कौशल्य कमी होते. काही प्रकरणांमध्ये आरोपी बेशुद्धावस्थेत जातो, तेव्हा सत्य जाणून घेता येत नाही. परंतु नार्को टेस्टमध्ये आरोपी प्रत्येक वेळी सत्य सांगतात आणि प्रकरण सोडवले जाईल असे होत नाही. बर्‍याच वेळा आरोपी अधिक हुशार असतात आणि चाचणी करणाऱ्या तपास टीमला देखील चकमा देतात.