नाशिकमध्ये पुन्हा हत्याकांडाचा थरार, उच्चशिक्षित पिता –पुत्रांचा निर्घृन खून, नंतर आरोपीची जंगी पार्टी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब कापडणीस (वय 70) आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस (वय 35) या दोघांचा अतिशय क्रूर खून (Murder) केल्याचे उघड झाल्याने शहर पुन्हा हादरले आहे.

    नाशिक : सध्या नाशिकमध्ये एकामागून एक भयानक घटना घडताना दिसत आहेत. तर आता एका उच्चशिक्षित पिता पुत्रांची निर्घृन  हत्या झाल्याचं उघड झालं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब कापडणीस (वय 70) आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस (वय 35) या दोघांचा अतिशय क्रूर खून (Murder) केल्याचं उघड झाल्याने शहर पुन्हा हादरलं आहे.  महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खूनही काही दिवसांपू्र्वी अशाच प्रकारे झाल्याचं समोर आलं होतं. नंतर पूर्व प्रेयसीने प्रियकराला जाळल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे नाशिकमध्ये हत्येंची मालिका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

    या प्रकरणात पोलिसांनी (Police) मुख्य आरोपी राहुल गौतम जगताप (वय 36) याला अटक केली आहे. राहुलने पिता-पुत्राची हत्या करून त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पेटवून दिल्याचं समोर आले आहे.  नाशिक येथील शरणापूर रोडवरील आनंदी गोपाळ पार्कमध्ये माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचे पुत्र अमित कापडणीस रहायचे. अमित यांनी एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केलंय. मात्र, ते प्रॅक्टीस करायचे नाहीत. अमित यांच्यासोबत आनंदी गोपाळ पार्कमधील हॉटेल व्यावसायिक राहुल जगतापने मैत्री केली होती. त्यानंतर अमितला व्यसनाधीन केले. तर डिसेंबरमध्ये नानासाहेब कापडणीस यांना गुंगीचे औषध देऊन शहराबाहेर नेले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा घाटात त्यांचा गळा आवळून खून केला. मृतदेह दरीत फेकून दिला. यानंतर अमितला भंडारदरा येथे फिरण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने शहराबाहेर नेत त्याचाही खून केला. त्याचा मृतदेह वाकी घाटात जाळून फेकून दिला.हे दोन्ही मृतदेह संबंधित भागातील पोलिसांना सापडले.

    दरम्यान जवळच्या पोलीस ठाण्यात कुठेही पिता पुत्र बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नव्हती. त्यामुळे तपास रखडला.  कापडणीस यांच्या पत्नी आणि मुलगी या मुंबईत राहतात. त्यांची मुलगी शीतलने कापडणीस यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल राहुल जगतापकडे आढळला. त्या वडील आणि भावाला भेटायला नाशिकमध्ये आल्या. मात्र, तुमच्या घराचे काम सुरू आहे. त्यामुळे कापडणीस दुसऱ्या फ्लॅटमध्ये रहायला गेल्याची थाप राहुलने मारली. त्यामुळे मुलगी शीतल पुन्हा मुंबईला गेली. त्यानंतरही वडिलांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्या नाशिकला आल्या. त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तेव्हा पोलिसांनाही राहुलवरच संशय येत होता. त्यांनी तपास केला असता खुनाला वाचा फुटली आहे. तर पिता पुत्रांचा खून झाल्याचं उघड झालं आहे.

    खून झाल्यानंतर राहुलने जंगी पार्टीही केली. हॉटेल व्यावसायिक राहुलने पिता-पुत्राचा थंड डोक्याने मर्डर केल्यानंतर त्याचा आनंदोत्सव साजरा केला. आपले मित्र आणि हॉटेलमधील 22 सहकाऱ्यांना रत्नागिरीला नेत तिथे थर्टीफर्स्टची जोरदार पार्टी केली. कोकणच्या पर्यटनाचा आनंद लुटला. चार दिवस मौजमजा करून ते पुन्हा नाशिकला परतले. कापडणीस यांच्या कुटुंबापैकी दुसरे कोणीही नाशिकमध्ये नाही. त्यामुळे कापडणीस पिता-पुत्र कुठे गेले आहेत, हे कोणीही विचारले नाही. त्याने त्यांच्या मुलीलाही खोटे सांगून मुंबईला धाडले होते. त्यामुळे आता सारं काही थंडावलं आहे, अशा आविर्भावात राहुल रहात होता. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असून आता राहूलला अटक केली आहे.

    राहुलने या पिता पुत्राचा खून का केला हा देखील मोठा प्रश्न आहे. तर याचंही कारण समोर आलं हे. नाशिकमध्ये कापडणीस यांची प्रचंड संपत्ती आहे. पंडित कॉलनीमध्ये चार प्लॅट, सावरकरनगरमध्ये दोन मोठे बंगले, 97 लाखांचे शेअर्स ट्रेडिंग, 20 लाखांची मुदतपूर्ण ठेव, 30 लाखांची मुदतपूर्ण ठेव, देवळाली कॅम्पमध्ये टोलेजंग रो-हाऊस, नानावलीत 14 लाखांचा गाळा आहे. इतरही त्यांची अमाप संपत्ती आहे. शिवाय कापडणीस पिता-पुत्र दोघेच रहायचे. हे पाहून त्याने नियोजनपद्ध पद्धतीने त्यांचा खून करून संपत्ती हडपण्याचा डाव रचला. हत्याकांडानंतर राहुल जगतपाने त्यांच्या खात्यावरील मोठी रक्कम आरटीजीएसद्वारे आपल्या खात्यावर वळवली. कापडणीस यांच्या खात्यातून शेअर्स विकस पैसा काढला. हे सारे रेकॉर्डवर होते. या आधारे पोलिसांनी राहुल जगतापला  अटक केली आहे तर पुढील तपासही सुरू आहे.