
2005 मध्ये राजू पाल यांच्या हत्येचा मुख्य साक्षीदार उमेश पाल याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही अतिक आणि अश्रफ यांच्यावर आहे.
प्रयागराज : उमेश पाल अपहरण प्रकरणात माफिया अतिक अहमद, (Atique Ahmed) दिनेश पासी (Dinesh pasi) आणि खान सुलत हनिफ यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्याची शिक्षाही न्यायालय काही वेळात जाहीर करणार आहे. दुसरीकडे, उर्वरित सात आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
2005 मध्ये बहुजन समाज पक्षाचे (BSP) तत्कालीन आमदार राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेश पाल याच्या अपहरण प्रकरणी दोघांना आज हजर करण्यात आले. अतिक आणि अश्रफ यांना आणताना न्यायालय आणि कारागृहाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही भावांना सोमवारी दोन वेगवेगळ्या कारागृहातून प्रयागराज येथे आणण्यात आले. 2005 मध्ये राजू पाल यांच्या हत्येचा मुख्य साक्षीदार उमेश पाल याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही अतिक आणि अश्रफ यांच्यावर आहे. 24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजमध्ये उमेश पाल आणि त्याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन पोलिसांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पाल यांची पत्नी जया यांच्या तक्रारीवरून अहमद, त्याचा भाऊ अशरफ, पत्नी शाइस्ता परवीन, दोन मुले, सहकारी गुड्डू मुस्लिम आणि गुलाम आणि अन्य नऊ जणांविरुद्ध प्रयागराजच्या धुमनगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नेमंक प्रकरण काय?
25 जानेवारी 2005 रोजी राजू पाल यांची हत्या झाली होती 25 जानेवारी 2005 रोजी सुलेमासराय येथे तत्कालीन आमदार राजू पाल यांची हत्या झाली तेव्हा उमेश पाल हा मुख्य साक्षीदार होता. अतीकने उमेशला त्याच्या माणसांसह राजू पाल खटल्यातील साक्षीपासून दूर जा, अन्यथा ठार मारण्याची धमकी दिली. पण उमेशला ते मान्य नव्हते. उमेशचे 28 फेब्रुवारी 2006 रोजी अपहरण करण्यात आले होते. 2007 मध्ये जेव्हा बसपा सरकार स्थापन झाले तेव्हा उमेशने त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 24 फेब्रुवारी 2023 रोजी उमेश याच प्रकरणात हजर होऊन घरी परतत असताना त्याची हत्या करण्यात आली होती.