जळगावात महापौरांच्या घरावर हल्ला; मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक

मेहरून परिसरात महापौर जयश्री महाजन यांचे निवासस्थान आहे. याच परिसरात स्थापन करण्यात आलेल्या गणपती मंडळाची मिरवणूक महापौरांच्या घरासमोरून जात असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर गुलाल फेकला.

    जळगाव : जळगावात (Jalgaon) गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी (Ganesha Mandal Activist) महापौरांच्या घरावर हल्ला (Attack On Mayor) केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. मेहरून परिसरात महापौर जयश्री महाजन (Jayashree Mahajan) यांचे निवासस्थान आहे. याच परिसरात स्थापन करण्यात आलेल्या गणपती मंडळाची मिरवणूक महापौरांच्या घरासमोरून जात असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर गुलाल फेकला (Throw Gulal).

    घरावर मोठ्या प्रमाणात गुलाल फेकल्याचे महापौर जयश्री महाजन यांच्या परिवाराच्या लक्षात आले. यावेळी, परिवारातील महिला सदस्यांनी गुलाल उधळण्यास विरोध केला. याच वेळी काही संतप्त कार्यकर्त्यांनी महापौर महाजन यांच्या परिवारातील सदस्यांना मारहाण करीत घरावर दगडफेक केली.

    या घटनेत पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताकडे दुर्लक्ष केल्याने हा हल्ला झाला असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. जर शहराच्या प्रथम नागरिकच सुरक्षित राहणार नसतील तर सर्व सामान्य जनतेचे काय, असा सवाल जयश्री महाजन यांनी केला. या घटने संदर्भात एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.