सख्ख्या मुलीच्या मैत्रिणीचं केलं लैंगिक शोषण, सातवीतल्या मुलीची आत्महत्या, भाजपा नेत्याच्या कॉल डिटेल्समध्ये हे काय आलं समोर?

भाजपा नेत्यानं केलेल्या लैंगिक शोषणामुळं सातवीत शिकणाऱ्या मुलीनं आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुलीचं शारिरिक आणि मानसिक शोषण या भाजपा नेत्यानं केलं, असा आरोप करण्यात आलाय.

आग्रा – रविवारी संध्याकाळी एका सातवीतल्या मुलीनं घरात गळफास लावून केलेल्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका भाजपा नेत्यानं केलेल्या लैंगिक शोषणामुळं तिनं हा प्रकार केल्याचं सांगण्यात येतंय. या मुलीचं शारिरिक आणि मानसिक शोषण या भाजपा नेत्यानं केलं, असा आरोप करण्यात आलाय. मृत मुलगी ही भाजपा नेत्याच्या मुलीची मैत्रीण होती. तिला या भाजपा नेत्यानं जाळ्यात ओढल्याचं सांगण्यात येतंय. सातत्यानं करण्यात येत असलेल्या शोषणामुळं कंटाळून या मुलीनं आत्महत्या केली. या प्रकरणात भाजपा नेत्याच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकपणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आलीय. उ. प्रदेशात आग्रा जिल्ह्यांत खंदौली भागातील एका गावात हा प्रकार समोर आलाय.

नेमका काय घडलाय प्रकार?

ही सातवीतील विद्यार्थिनी गावातील एका शाळेत शिकत होती. तिच्यासोबतच गावातील भाजपा नेता राघवेंद्र सिंह चौहान यांचीही मुलगी शिकत होती. या दोन्ही मुलींमध्ये चांगली मैत्री होती. त्यामुळं दोघीही एकमेकांच्या घरी जात-येत असत. रविवारी संध्याकाळी सातच्या सुमाराला या मुलीनं घरात गळफास घेून आत्महत्या केली. त्यावेळी तिचा 8 वर्षआंचा भाऊ घरात होता. तर आई वडील शेतात गेले होते.

कॉल डिटेल्समध्ये उघड झाला प्रकार

मुलीला फासावर लटकलेलं पाहिल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या मुलीला लॉकडाऊनच्या काळात शिक्षणासाठी वडिलांनी मोबाईल घेऊन दिला होता. पोलि्सांनी जेव्हा मोबाईल तपासला तेव्हा एका मोबाईलवर ही मुलगी बराच वेळ संभाषण करत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी या नंबरचा शोध घेतला तेव्हा हा नंबर या मुलीच्या मैत्रिणीच्या वडिलांचा म्हणजेच राघवेंद्र सिंह चौहान या भाजपा नेत्याचा निघाला. ही मुलगी त्याला अंकल म्हणत असे. राघवेंद्र सिंह या मुलीच्या घरी जात-येत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर राघवेंद्र सिंह याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दत्तक घेतली होती मुलगी

मृत मुलगी ही सातवीत होती. तिला या दाम्पत्यानं नातेवाईकांडून दत्तक घेतलं होतं. तेव्हापासून ते तिलं पालन पोषण करीत होते. तिच्याकडे घरात विशेष लक्ष देण्यात येत असे. मुलगी मोबाईलवर सतत बोलत असल्याबाबत तिला टोकण्यातही आलं होतं. आता मुलीनं गळफास घेतल्यानं हे दाम्पत्य दु:खात आहे.