
कॉल फॉरवर्डिंग स्कॅम : जिओ, एअरटेल यासह अन्य काही टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना गंभीर इशारा दिला आहे. कॉल फॉरवर्डिंग स्कॅमच्या माध्यमातून फसवणूक होण्याची प्रकरणे वाढल्यामुळे, सावध राहण्याचा सल्ला कंपन्यांनी ग्राहकांना दिला आहे. कॉल फॉरवर्ड होणे, म्हणजे तुम्हाला आलेला फोन दुसऱ्याच एका नंबरवर पुढे जाणे. स्कॅमर्स तुमच्या नंबरवर कॉल फॉरवर्डिंग हा ऑप्शन सुरू करतात. त्यानंतर तुम्हाला येणारे सर्व कॉल किंवा मेसेज देखील त्यांच्या नंबरवर जातात. यामुळे तुमची मोठी आर्थिक फसवणूक देखील होऊ शकते.
स्कॅमर्स सगळ्यात आधी मोबाईल कंपनी किंवा इंटरनेट प्रोव्हाईडर कंपनीतून बोलत असल्याचं सांगून तुम्हाला फोन करतात. यावेळी ते तुम्हाला काही समस्या येत आहे का याबाबत विचारणा करतात, किंवा सर्व्हिसबद्दल फीडबॅक मागतात. यानंतर तुमची एखादी समस्या सोडवण्यासाठी ते काही स्टेप्स फॉलो करण्यास सांगतात. या प्रोसेसमध्ये ते कॉल फॉरवर्डिंग नंबर डाएल करायला सांगतात. यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करताच तुमच्या नंबरवर कॉल फॉरवर्डिंग सेवा सुरू होते.
यानंतर तुम्हाला येणारे कॉल, मेसेज त्या स्कॅमर्सकडे जातात, आणि तुम्हाला याबाबत कळतही नाही. या माध्यमातून ओटीपी, महत्त्वाचे कॉल अशा गोष्टी स्कॅमर्सना सहज मिळू शकतात. सर्वात आधी तुम्हाला कॉल फॉरवर्डिंग कोडबद्दल माहिती हवी. तुमच्या मोबाईल नंबरवर ही सेवा सुरू करण्यासाठी *401* आणि पुढे तुमचा मोबाईल नंबर डाएल करावा लागतो. जर तुम्हाला कोणी असं करण्यास सांगत असेल, तर सावध व्हा. मोबाईल कंपन्या तुम्हाला कधीही स्वतःहून कॉल फॉरवर्डिंग सुरू करण्यास सांगत नाहीत. तसंच मोबाईल कंपन्यांचे कर्मचारी तुम्हाला पर्सनल नंबरवरुन फोन करत नाहीत. त्यामुळे असं होत असल्यास सावध व्हा.