ग्राहक सेवा पडली महाग; महिलेच्या बँक खात्यातून साडेअकरा लाख रुपये गायब

बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करुन सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींनी महिलेच्या दोन बँक खात्यातून सुमारे साडेअकरा लाख रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

    मुंबई – बँक खात्यातील रक्कम हस्तांतरित करण्यासाठी ग्राहक सेवा केंद्राला (Customer Care Center) दूरध्वनी करणे ५८ वर्षांच्या महिलेला भलतेच महागात पडले. बँकेचा अधिकारी (Bank Manager) असल्याची बतावणी करुन सायबर फसवणूक (Cyber Fraud) करणाऱ्या आरोपींनी महिलेच्या दोन बँक खात्यातून सुमारे साडेअकरा लाख रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत (Technology Restrictions Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

    अंधेरीतील लोखंडवाला परिसरात (Lokhandwala Complex) तक्रारदार महिला तिच्या वयोवृद्ध पतीसह राहते. तिला एक मुलगा असून तो अमेरिकेत राहतो, तर मुलगी डॉक्टर असून ती सध्या जमैका येथे राहते. ते दोघेही त्यांच्या मुलीकडे राहत असून दोन ते तीन वर्षांतून एकदा मुंबईत येतात. ११ नोव्हेंबरला तक्रारदार महिलेला तिच्या एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात काही रक्कम हस्तांतरीत करायची होती, मात्र प्रक्रिया करुनही व्यवहार पूर्ण होत नव्हता. त्यामुळे तक्रारदार महिलने गुगलवरुन बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा दूरध्वनी क्रमांक शोधला. त्यावेळी तिला एक मोबाईल क्रमांक सापडला. त्यावर संपर्क साधल्यानंतर संबंधित व्यक्तीने तो बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून तिला एकर अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

    तिने ते अॅप डाऊनलोड करुन तिच्या बँक खात्याची माहिती दिली. त्यावेळी तिच्या बँक खात्यातून १० लाख ३५ हजार रुपये हस्तांतरीत झाले. याबाबत तिने विचारणा केली असता ही रक्कम तिच्या खात्यात पुन्हा जमा होईल, तुम्ही काळजी करु नका असे सांगून तिचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिच्याकडून दुसर्‍या बँक खात्याची माहिती घेऊन त्या खात्यातून सहा ऑनलाईन व्यवहार करुन १ लाख ३४ हजार रुपयांचा अपहार केला. बँक अधिकारी बोलत असल्याची बतावणी करुन या ठगाने दोन बँक खात्यातून सुमारे साडेअकरा लाख रुपये काढले.