तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला खाडीत, नेहमीप्रमाणे बॅंकेतून घरी जाण्यासाठी निघाली पण घरी पोहोचलीच नाही

गेल्या तीन दिवसापासून ही मुलगी बेपत्ता होती. पोलिसांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह दाभोळ खाडीत पाण्यावर तरंगताना आढळून आला.

  गेल्या तीन दिवसापासून रत्नागिरीतील चिपळूण (Chiplun) येथून बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेहच दाभोळ खाडीत (Dabhol Creek) पाण्यावर तरंगताना सापडला आहे. या घटनेनंतर चिपळूणच्या ओमळी गावात एकच खळबळ उडाली आहे.  निलीमा सुधाकर चव्हाण असं मृत तरुणीचं नाव आहे. आरोपीला अटक करण्याची मागणी करत नातेवाईंकानी मृतदेह घेण्यास नकार दिला होता. आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला.

  नेमका प्रकार काय?

  मृत निलीमा सुधाकर चव्हाण युवती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली (Dapoli) शाखेत काम करत होती. गेल्या तीन-चार दिवसापासून बेपत्ता होता. कुटुंबियांना पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान, चार दिवसांनंतर तिचा मृतदेह दाभोळच्या खाडीत पाण्यावर तरंगताना आढळला आहे. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तिचे केस कापण्यात आले होते. शिवाय तिच्या भुवया देखील काढल्या होत्या. तिच्या अवस्थेवरुन तिच्यासोबत घातपात झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.

  29 जुलैला घरुन निघाल्यानंतर परतली नाही

  निलीमा  29 जुलै रोजी ती नेहमीप्रमाणे बँकेत गेली होती. संध्याकाळी बँकेतून ओमळी गावातील घरी परत येण्यास निघाली. परंतु या प्रवासादरम्यान ती वाटेतच बेपत्ता झाली. तीन दिवस घरी ती परतली नसल्याने पोलीस तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी तपास सुरू करत परिसरातली अनेक सिसिटिव्ही फुटेज तपासले. यावेळी खेडमधील एसटी स्टँडच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निलीमा दिसली. चिपळूणला जाणाऱ्या एसटीमध्ये बसताना दिसली. त्यानंतर ती बेपत्ता झाली. तिचा मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन 29 जुलैच्या रात्री 12.05 वाजता अंजनी रेल्वे स्टेशन दाखवत आहे.

  मृतदेह बघताच कुटुंबियांनी फोडला टाहो

  बेपत्ता झालेल्या निलीमा  मृतदेह खाडीत आढळ्यानंतर, पोलिसांनी याची माहिती तिच्या कुटुंंबियांना दिली. तिचा मृतदेह पाहताच त्यांनी टाहो फोडला. जोपर्यंत घडलेल्या घटनेचा तपास पोलीस लावत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका मुलीच्या नातेवाईकांनी काल घेतली होती. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. चिपळूणमध्ये काल जिल्ह्यातील मृत महिलेच्या समाज बांधवांनी आणि विविध सर्वपक्षीय नागरिकांनी चिपळूण पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि पोलिसांकडे लवकरात लवकर तपास करुन आरोपीला तात्काळ अटक करावी आणि आम्हाला न्याय द्यावा ही मागणी केली.