दहशतवाद्यांना आर्थिक मदत : एनआयए-एटीएसकडून देशभरात छापेमारी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, मालेगावमधूनही एटीएसने एकाला ताब्यात घेतले आहे. तर, औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुण्यात पीएफआय आपल्या हालचालींचे केंद्र तयार करत असल्याचे गुप्तचर संस्थांना संशय आहे.

    नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएने रात्री तीन वाजताच नवी मुंबईतील (Navi Mumbai) नेरूळमधील पीएफआयच्या कार्यालयावर छापा मारला. तर, पुण्यातही (Pune) कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

    पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, मालेगावमधूनही एटीएसने (ATS) एकाला ताब्यात घेतले आहे. तर, औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुण्यात पीएफआय आपल्या हालचालींचे केंद्र तयार करत असल्याचे गुप्तचर संस्थांना संशय आहे.

    एनआयए, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या छाप्यात पीएफआयच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पीएफआयचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे.

    राज्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये एनआयए, महाराष्ट्र एटीएसने कारवाई केली आहे. आणखी काही जिल्ह्यांमध्ये कारवाई होण्याची शक्यता आहे.