पनवेलमध्ये महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, व्यावसायिक वाद ठरलं कारण

हा गोळीबार व्यावसायिक वादातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

नवी मुंबई : गेल्या काही दिवसापासून नवी मुंबई (Navi Mumbai) आणि पनवेलमध्ये (panvel) परिसरात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी नेरुळमध्ये एका बिल्डरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा अद्याप झाला नसून आता पुन्हा पनवेल परिसरात एका महिला बांधकाम व्यावसायिकेवर गोळीबार करण्यता आल्याची घटना घडली आहे. स्नेहल पाटील असं जखमी झालेल्या महिलेचं नाव असुन त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू आहेत.  या घटनेमुळे परिसरात दहशतीच वातावरण आहे.

नेमका प्रकार काय?

(28 मार्च) रात्रीच्या सुमारास स्नेहल पाटील बांधकाम व्यावसायिक पनवेलवरुन उरणच्या दिशेने त्यांच्या गाडीने जात होत्या. यावेळी गव्हाण फाटा येथे अज्ञात इसमाने येऊन स्नेहल पाटील यांच्या गाडीवर फायरिंग केलं. यावेळी गोळी स्नेहल पाटील यांच्या पायाला लागल्याने त्या जखमी झाल्या. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. लगेच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना उपचारासाठी नेरुळ इथल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

जुन्या वादातुन हल्ला?

स्नेहल पाटील यांच्यावरील हल्ला करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा गोळीबार व्यावसायिक वादातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

या पुर्वीही घडली घटना

तर बिल्डरवर गोळीबार करण्याची ही एकाच महिन्यातील दुसरी घटना आहे. याआधी 15 मार्च रोजी नेरुळमध्ये एका बिल्डरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. आरोपींनी बिल्डरवर तीन गोळ्या झाडल्या. सावजीभाई पटेल असं मृत बांधकाम व्यावसायिकाचं नावं होतं. दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरानी त्यांच्यावर गोळीबार केला होता.