salim fruit

सलीम फ्रूट (Salim Fruit) याला ४ ऑगस्टला एनआयएने अटक केली. त्याला १७ ऑगस्टपर्यंतची एनआयएची कोठडी (NIA Custody) सुनावण्यात आली आहे. सलीमला अटक होण्याआधी विशालने मोठ्या नेत्यासोबत आपली ओळख असल्याचे सांगून एनआयच्या चौकशीतून वाचण्यासाठी ५० लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले.

    मुंबई : गँगस्टर छोटा शकीलचा (Chhota Shakeel) साडू मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट (Salim Fruit ) याची फसवणूक करण्यात आली आहे. एनआयएच्या चौकशीतून (NIA) वाचवण्याचे आमिष दाखवून सलीम फ्रूटची ५० लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयितांना अटक केली आहे.  विशाल देवराज सिंह उर्फ विशाल काळे, जाफर उस्मानी आणि पवन मूत्रेजा या तिघांना दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे. एनआयएने त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

    सलीम फ्रूट याला ४ ऑगस्टला एनआयएने अटक केली. त्याला १७ ऑगस्टपर्यंतची एनआयएची कोठडी सुनावण्यात आली आहे. सलीमला अटक होण्याआधी विशालने मोठ्या नेत्यासोबत आपली ओळख असल्याचे सांगून एनआयच्या चौकशीतून वाचण्यासाठी ५० लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर सलीमने त्याला ५० लाख दिले. त्यानंतर पुढील डील करण्यासाठी सलीम याला दिल्लीला बोलवण्यात आले होते.  काही दिवस दिल्लीत थांबल्यानंतर विशालने सलीम याला परत मुंबईला जाण्यास सांगितले. या सगळ्याची माहिती एनआयएला मिळाली. त्यामुळे एनआयएने सलीम आणि विशालला ताब्यात घेतले. चौकशीनंतर विशालला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

    एनआयएने आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहिम शेख, छोटा शकील, जावेद पटेल उर्फ ​​जावेद चिकना आणि टायगर मेमन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भारतात हिंसाचार पसरवण्यासाठी दाऊद योजना आखत आहे. त्यासाठी त्याने भारतात एक युनिट तयार केल्याचा आरोप एनआयएने केला आहे. भारतातील बडे नेते आणि व्यावसायिकांना लक्ष्य करण्याची दाऊदची योजना आहे. दिल्ली आणि मुंबईसह इतर शहरांमध्ये हिंसाचार पसरवण्याचा दाऊदचा इरादा आहे, असे एनआयएने आपल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.