
पालघरमध्ये एका 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पालघर : पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पालघरच्या माहीम (Palghar Mahim) परिसरात
एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार (sexual assault on minor girl) केल्याची घटना उघडकीस आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आठ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केले जाणार आहे.
पालघर तालुक्यातील माहीम परिसरातील पाणेरीनजीक ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने आधी निर्जनस्थळी नेले. यावेळी त्याने त्याच्या मित्रांनाही बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने आठ जणांनी अत्याचार केला. याप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.हे सर्व आरोपी हे पालघर तालुक्यातील आहेत. आरोपी माहीम, हनुमान पाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील रहिवासी असून बहुतांश तरुण हे नशेच्या आहारी असल्याची माहिती आहे. यातील काही आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने माहीम पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. सध्या पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची प्रकृती बरी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सातपाटी पोलीस करीत आहे.