ऐकावं ते नवलचं! हळदी समारंभाला फटाके नाही तर थेट स्फोटकं, पोलिसांची कारवाई

ग्रामस्थांनी गाडी अडवून तपासणी केली असता गाडीत एका खोक्यात स्फोटके आणि दोन मीटरची वात, ज्वलनशील पदार्थ असल्याचे दिसले.

    मुरबाड  – सध्या लग्नसराई सुरू आहे. तर निर्बंध हटवल्याने नागरिक धुमधडाक्यात समारंभ साजरे करत आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या एका हळदी समारंभात चक्क स्फोटकं आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुरबाड तालुक्यातील वाघाचीवाडी येथे अरुण बाबाजी पादिर यांच्या मुलाच्या हळदी समारंभाला आमंत्रण नसताना पाहुण्यांनी आपल्या गाडीत स्फोटके व ज्वलनशील पदार्थ आणल्याची घटना घडली असून, यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नागरिकांनी प्रमोद जानू शिंगे, विलास सोमा शिंगे यांना पकडून स्फोटके आणलेल्या गाडीसह पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, दोन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. मुरबाड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

    मुरबाड-म्हसा-बोराडपाडा मार्गावर असलेल्या वाघाचीवाडी येथील अरुण बाबाजी पादिर यांच्या मुलाचा ८ मे रोजी हळदी समारंभ होता. निमंत्रण नसतानाही आलेले पाहुणे प्रमोद जानू शिंगे व विलास शिंगे यांच्यासह चार जण इर्टिका कार व मोटारसायकलने आले असता ते गावाच्या जवळपास येताच त्यांच्या हालचालीवरून ग्रामस्थांना संशय आला. त्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी गाडी अडवून तपासणी केली असता गाडीत एका खोक्यात स्फोटके आणि दोन मीटरची वात, ज्वलनशील पदार्थ असल्याचे दिसले. त्यावेळी ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांना कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी प्रमोद शिंगे, विलास शिंगे यांच्यासह चौघांना पकडून ठेवले असता त्यातील दोघांनी पकडणाऱ्यांच्या हाताला चावा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी त्यांना आपल्या गाडीसह ताब्यात घेतले आहे.

    घरगुती भांडणातून प्रकार!
    याबाबत पाहुण्याकडे ही स्फोटके आली कुठून व ते त्यांची वाहतूक का करत होते, याचा अधिक तपास मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिल सोनोने करीत आहेत. याबाबत अधिक विचारणा केली असता हे घरगुती नातेसंबंधातील भांडण आहे. यजमान व पाहुणे यांच्यात परस्पर आरोप झाल्याने गुन्हे मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. जाणूनबुजून आम्हाला अडकविण्यासाठी हे प्रकरण घडवून आणल्याचे पाहुण्या आरोपींचे म्हणणे आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.