मुलीचं दुसऱ्या जातीतल्या मुलावर प्रेम, आई-वडील आणि 2 भावांचा संताप अनावर, कुऱ्हाडीने वार करत घेतला मुलीचा जीव!

उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे आई-वडील आणि दोन भावांनी मिळून आपल्याच अल्पवयीन मुलीचा कुऱ्हाडीने वार केला. कारण मुलीचं दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम होतं.

    काही जणांना स्वत:चा मान सन्मानापुढे काहीही दिसत नाही. त्यांच्या मानसन्मानला ठेच न लागावी यासाठी ते  स्वत:च्या मुलांचाही जीव घ्यायला मागचा पुढचा विचार करत नाही. उत्तर प्रदेशमधील कौशांबी येथे अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे आई-वडील आणि दोन भावांनी मिळून आपल्याच अल्पवयीन मुलीचा कुऱ्हाडीने वार करत खून (Honour killing ) केला. मुलीचं दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम होतं जे कुटुबियांना पसंत नव्हतं. त्यामुळे त्यांनी संतापाच्या भरात तिची हत्या केली.  दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि सर्व आरोपींना अटक केली.

    आई-वडील आणि भावांनी मुलीच्या हत्येचा गुन्हा कबूल केला

    सराई अकिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील ही धक्कादायक घटना आहे. शनिवारी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्या आई-वडील आणि दोन भावांनी मिळून हत्या केली होती. माहिती मिळताच एसपी, डीएमसह पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. चौकशीत सर्व आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

    नेमकं काय झालं

    मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाचे दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम होते. ती नेहमी गुपचूप तिच्या प्रियकराशी फोनवर बोलत होती आणि त्याला भेटायलाही जात होती. याची माहिती तिच्या पालकांना मिळताच त्यांनी तिच्यावर बंदी घातली.  मात्र त्यानंतरही मुलीने प्रियकराशी बोलणे सोडले नाही. ती रोज रात्री मुलाशी फोनवर बोलत होती. शनिवारी आई-वडिलांनी मुलीला मोबाईलवर बोलतांना पकडले आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर ती मुलाशी बोलण्याचा हट्ट करत राहिली. त्यानंतरच आई-वडील आणि तिच्या दोन भावांनी मिळून अल्पवयीन मुलीवर कुऱ्हाडीने वार केले. यादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांच्या मदतीने या हत्या प्रकरण समोर आलं. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ येऊन सर्व आरोपींना अटक केली.