
मुंबई : काही दिवसापुर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाला होता. यावरुन राज्यभरात चांगलीच खळबळ उडाली होती. आता किरिट सोमय्या यांना त्यांचा तोच व्हिडिओ व्हायरल करण्याची (Kirit Somaiya receives extortion email ) धमकी देण्यात आली आहे. यासोबत त्यांना 50 लाख रुपयाची मागणीही करण्यात आली आहे.याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) तक्रार केली आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात एक मेल आला होता. त्यामध्ये अज्ञाताने सोमय्यांना त्यांचा कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 50 लाख रुपये द्या अन्यथा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी देण्यात आली. सोमय्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने सोमय्यांचा कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
जुलै महिन्यात व्हिडिओ झाला होता व्हायरल
किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. एका मराठी वृत्तवाहिनीने 17 जुलै रोजी रात्री यासंदर्भात वृत्त प्रसारीत केले होते. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दानवे यांनी एक पेन ड्राईव्हदेखील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिला होता. या संपूर्ण प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.