भयानक! बळी देण्यासाठी दाम्पत्यानं करवतीनं कापले स्वत:चेच गळे, मुंडकी अग्नीत दिली झोकून, सुसाईड नोटमधून अंधश्रद्धेचा प्रकार उघड

  राजकोट- अंधश्रद्धेचं गारुड (Superstition) अजूनही समाजमनावर असल्याच्या अनेक कहाण्या आपण नेहमीच ऐकत असतो. गुप्त धनासाठी, पुत्रप्राप्तीसाठी नरबळी देण्याचे प्रकारही ऐकिवात आहेत. मात्र बळी देण्यासाठी कुणी स्वत:चीच हत्या केल्याची कल्पनाही करवत नाही. (Gujarat) गुजरातमध्ये मात्र हा प्रकार खरेखरीच घडलाय. राजकोट जिल्ह्यात एका गावात पती आणि पत्नीनं गिलोटिन सारख्या ब्लेडच्या उपकरणाच्या सहाय्यानं स्वत:चेच गळे कापून घेतल्याचा (Husband Wife Killed Themselves)धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गळे चिरल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुंडक्यांची आहुती अग्निकांडात दिल्याचंही समोर आलंय. पोलिसांनी जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा तेही हादरलेत.

  नेमका काय घडलाय प्रकार

  राजकोट जिल्ह्यातल्या विंछिया गावात एका झोपडीत शीर नसलेले दोन मृतदेह सापडले. त्यानंतर या ठिकाणी पोलिासंना बोलावण्यात आलं. पोलि्सांनी केलेल्या चौकशीत या झोपडीत राहणाऱ्या हेमूभाई मकवाना वय ३८ वर्ष आणि त्यांची पत्नी हंसाबेन वय ३५ वर्ष यांचे ते मृतदेह असल्याचं समोर आलं. ब्लेड सारख्या उपकरणांनी या दोघांनी स्वताच स्वता:ची मुंडकी कापून घेतल्याचा हा प्रकार असल्याचं सुसाईड नोटमधून समोर आलंय. मुंडकी कापल्यानंतर ती अग्निकांडात पडतील अशी व्यवस्थाही या पती-पत्नीनं आधीच केली होती. अंगावर शहारा आणणारा हा प्रकार पाहिल्यानंतर स्थानिक चांगलेच धास्तावले आहेत.

  काय होतं सुसाईड नोटमध्ये

  या दाम्पत्यानं एकत्र शीर कापण्याची योजना तयार केली होती. ब्लेडनी मुंडकी कापली जातील अशी रचना त्यांनी केली होती. एका मोठ्या जाड दोरीला त्यांनी मोठं करवतीचं ब्लेड बांधलेलं होतं. दोरी सोडल्यानंतर या ब्लेडनं त्यांच्या धडावरुन शीर खाली पडणार होतं. शीर अग्निकुंडातच पडावं, यासाठी विशेष लक्ष देण्यात आलं होतं. हे दोघंही पती-पत्नी गेल्या वर्षभरापासून दररोज रात्री घरी पूजा करीत असत. हा बळीचा प्रकार त्यांनी शनिवारी रात्री केला.

  दोन मुलं अनाथ

  बळी गेलेले हेमूभाई यांची दोन्ही मुलं आता अनाथ झाली आहेत. त्यांची मुलं शिक्षणासाठी त्यांच्या आई-वडिलांकडे होती. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यानं त्यांनी बळी जाण्याचं ठरवलं असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सुसाईड नोटमध्ये या दोन्ही मुलांचा सांभाळ करा, अशी विनंती त्यांनी नातेवाईकांना केली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, दोन्ही मृतदेह हे पोस्टटमार्टेमसाठी पाठवण्यात आलेत.