रुग्णालयातून जीवघेण्या औषधाची चोरी करुन बायकोची हत्या; पुण्यातील रुग्णालय कर्मचाऱ्याचे कृत्य

    पुणे येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे, रुग्णालयातून जीवघेण्या औषधाची चोरी करुन तेच औषध इंजेक्शनद्वारे पत्नीच्या शरीरात टोचून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील पौड रोड पोलीस ठाण्यात या धक्कादायक घटनेबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

    स्वप्नील सावंत नामक एका 23 वर्षीय पुरुष नर्सला संशयावरुन अटक केली आहे. स्वप्नील सावंत हा एका रुण्गालयात परिचारक म्हणून काम करत होता. त्याचे रुग्णालयातीलच एका महिला परिचारीकेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्यातूनच हे कृत्य घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. स्वप्नील सावंत याने पत्नीची हत्या करुन तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. आरोपी स्वप्नील सावंत याने पीडिता प्रियंका क्षेत्रे हिच्यासोबत विवाह केला होता. नवविवाहीत असलेले हे दाम्पत्य पुणे येथे भाड्याच्या घरात राहात असे. आरोपीने अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या त्याच्या पत्नीला म्हणजेच प्रियंक हिला 14 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

    प्रियंका हिने स्वाक्षरी केलेली कथित सुसाईड नोटही पोलिसांना सापडली आहे. या नोटमध्ये पीडितेवर घरगुती हिंसाचार होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी घरगुती हिंसाचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केले प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात घडलेल्या या भयावह घटनेची वैद्यकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. रुग्णालयात कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनेच अशा प्रकारचे कृत्य केल्याने वैद्यकीय वर्तुळातील सुरक्षीतता तसे कौटुंबीक हिंसाचाराच्या घटनांचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे.