
नाशिकमधील लोहोणेर येथे शुक्रवारी (दि.११ फेब्रूवारी) प्रेयसीने कुटुंबियांच्या मदतीने आपल्या प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, या घटनेतील युवक ८५ टक्के भाजल्याने उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात युवकाचा मध्यरात्री मृत्यू झाला.
नाशिक : प्रेयसीनेच आपल्या पूर्व प्रियकराला जाळल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात घडली होती. याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. नाशिकमधील लोहोणेर येथे शुक्रवारी (दि.११ फेब्रूवारी) प्रेयसीने कुटुंबियांच्या मदतीने आपल्या प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले होते. न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, या घटनेतील युवक ८५ टक्के भाजल्याने उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात युवकाचा मध्यरात्री मृत्यू झाला.
दरम्यान प्रेमदिनीच म्हणजे आज व्हॅलेंटाईनदिनी या प्रियकराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने लोहोणेर गाव हादरले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रावळगाव येथील युवतीने तिच्या कुटुंबीयांसह लोहोणेर येथे येऊन आपला प्रियकर गोरख बच्छाव याच्याशी वाद घालत, त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी कल्याणी गोकुळ सोनवणे हिच्यासह गोकुळ तोंगल सोनवणे, निर्मला गोकुळ सोनवणे, तसेच तिचे दोन्ही भाऊ हेमंत गोकुळ सोनवणे व प्रसाद गोकुळ सोनवणे (सर्व रा.बी. सेक्शन, रावळगाव) यांना ताब्यात घेतले होते. व त्यांना १५ तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती.
मृत तरूण गोरख बच्छाव (वय ३१) हा काही वर्षांपूर्वी रावळगाव ता.मालेगाव येथील सदर युवतीच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते. मात्र, युवतीच्या घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न निश्चित केले होते. सदर विवाह मोडल्याने तो गोरख यानेच मोडल्याचा संशय मुलीच्या घरच्यांना येत होता.
सदर मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी लोहोणोर येथे य़ेऊन गोरखच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार केले, मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान ही घटना घडल्यानंतर संबंधित युवती व तिचे कुटुंबीय स्वतः पोलिसांत हजर झाले होते. त्यानंतर, देवळा पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. शनिवारी (दि.१२) त्यांना न्यायालयात हजर केले होते.
आज पहाटे गोरखची मृत्यूशी झुंझ संपली आणि त्याचा मृत्यू झाला. ८५% भाजलेल्या गोरखचं निधन झाल्याने व्हॅलेंटाईन डे दिनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.