मानल बुवा! शेजारी पोलीस चौकी अन तरीही घरफोडी

मुक्तीधाम ओंकारेश्वर दशक्रिया घाटावरील गुरूजींचे साहित्य चोरीला गेले आहे. विशेष म्हणजे हि चोरीची दुसरी वेळ आहे.

    पुणे : पोलीस चौकीच्या अगदीच शेजारी असलेल्या “मुक्तीधाम ओंकारेश्वर दशक्रिया घाटा”वरील दशर्किया विधी केले जाणारे साहित्य चोरट्यांनी घरफोडीकरून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापुर्वीही २०२१ मध्ये ही अशी घटना घडली होती. शेजारी पोलीस चौकी तरीही चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे शहरातील घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचे धाडसही वाढले असल्याचे दिसत आहे. अद्यापही त्या चोरीचा थांगपत्ता लागलेला नाही.

    याबाबत माहिती अशी की, ओंकारेश्वर घाटावर दशर्किया होतात. पुलाजवळ महापालिकेची इमारत आहे. या इमारतीत एका खोलीत दशर्किया करणारे गुरूजींचे साहित्य ठेवण्यात येते. मुक्तीधाम ओंकारेश्वर दशक्रिया घाट नावाने ओळखले जाते. दरम्यान, या इमारतीच्या शेजारीच “शनिवार पेठ पोलीस चौकी आहे.

    तरीही मध्यरात्री चोरट्यांनी पाठिमागच्या बाजूने इमारतीत प्रवेश केला. तसेच, खोलीच्या कुलूप तोडून लोखंडी व गोदरेज कपाटांचे दोन्ही कुलूप तोडून त्यातून तांब्याचे साहित्य चोरून नेले. त्यामध्ये ३० मोठी ताम्हण, २९ छोटी ताम्हण, ३० पळ्या, १२ तांबे, १८ छोटे तबक, २८ छोटे शांती तांबे, असे साहित्य चोरीला गेले आहे. याबाबत अद्याप तक्रार देण्यात आलेली नाही. आता शहरात घरफोड्या वाढल्याचे वास्तव आहेच, पण चोरटे पोलीस चौक्या अन ठाण्यांच्या शेजारीच चोऱ्या करू लागल्याने त्यांचे धाडस वाढल्याचे दिसत आहे. तर, दुसरीकडे पोलीसांना या घटना रोखण्यात अपयश येत असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.

    दरम्यान, एप्रिल २०२१ मध्ये देखील याच ठिकाणी चोरी झाली होती. त्यावेळी येथून मोठ्या प्रमाणात चांदीची भांडी व तांब्याची भांडी चोरीला गेली होती. त्याबाबत पोलीसांकडे तक्रार देण्यात आली होती. पण, त्याचा उलघडा होऊ शकलेला नाही. दरम्यान, या चोरीबाबत क्रिएटीव्ह फाऊंडेशनचे संदीप खर्डेकर यांनी पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्त यांना पत्र दिले आहे.

    पोलीस चौकी शेजारीच आहे. पण, तरीही चोरीची ही दुसरी वेळ आहे. आम्ही आठ ते दहा गुरूजी इथे दशक्रिया विधी करतो. त्याचे साहित्य याठिकाणी ठेवलेले असतात. पण, ही चोरीची दुसरी वेळ आहे. त्यावेळी चांदीची भांडी नेली. आता तांब्याची भांडी नेली आहेत. शेजारी पोलीस चौकी असूनही चोरीची दुसरी वेळ आहे. काही होत नाही, त्यामुळे अद्याप तरी तक्रार दिली नाही, अशी माहिती येथील गुरूजी प्रशांत यांनी दिली.