विरार विनयभंग प्रकरणी आरोपी व्हॅन चालकाची नार्को, पॉलीग्राफ चाचणी करणार पोलीस

आरोपीच्या नार्को आणि पॉलीग्राफ चाचणीती परवानगी मिळाल्यानंतर पोलीस त्याला मुंबईतील कलिना किंवा गुजरातमधील अहमदाबाद येथे घेऊन जाऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.

    पालघर :  10 डिसेंबर रोजी विरारमध्ये चालत्या व्हॅनमध्ये महिेलेचा विनयभंग आणि बाळाच्या मत्यूप्रकरणी (Virar Molestation Case) एक मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी चालकाची नार्को आणि पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांनी वसई न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणी आरोपी व्हॅनचालक, विजय खुशवाहलानेही या चाचण्या करण्यास तयार असल्याचं पोलिासांनी न्यायालयाला सांगितलं. 

    नेमकं प्रकरण काय?

    शनिवारी 10 डिसेंबर 2022 रोजी 11.30 च्या दरम्यान एका प्रवासी इको कारमध्ये 21 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. त्याबरोबर तिच्या 11 महिन्याच्या मुलीला धावत्या कारमधून फेकून देण्यात आल्याचा आरोप पिडीत महिलेने केला होता. यात मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी  आरोपीला काही तासांनंतर अटक केली होती. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नालासोपारा येथील पेल्हार येथे ही घटना घडली होती. 

    पतीसोबत भांडण झाल्यानंतर ही महिला बाळाला घेऊन निघाली होती. ती वाडा येथील तिच्या गावी जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान तिने स्वत:च तिच्या बाळाला बाहेर फेकून दिले होते का, याचाही तपास पोलीस करत आहेत.कारण व्हॅनमधून बाळ कसे पडले हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे कोणतीही सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे, ड्रायव्हरच्या नार्को आणि खोटे शोधक चाचण्या महत्त्वपूर्ण ठरतील, या अनुषंगाने ही चाचणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस  महिलेची अशीच चाचणी घेण्याची आवश्यकता आहे का नाही याचीही पोलिस चाचपणी करत आहेत. दरम्यान, आरोपीच्या  नार्को आणि पॉलीग्राफ चाचणीती परवानगी मिळाल्यानंतर पोलीस  त्याला मुंबईतील कलिना किंवा गुजरातमधील अहमदाबाद येथे घेऊन जाऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.