Sale of 27 trucks with modification in Dhule

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दमदार कारवाई केली आहे. इंजिन वॉचेस नंबर बदलून ट्रक्सची हेराफेरी करणार्‍या ट्रान्सपोर्ट कमिशन एजंट आणि आरटीओ एजंटला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सुमारे दीड कोटी रुपये किंमतीच्या बारा ट्रका जप्त करण्यात आल्या आहेत. देशभरात हे रॅकेट असल्याचा संशय जिल्हा पोलिस प्रमुख प्रविणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे(Sale of 27 trucks with modification in Dhule).

  धुळे : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दमदार कारवाई केली आहे. इंजिन वॉचेस नंबर बदलून ट्रक्सची हेराफेरी करणार्‍या ट्रान्सपोर्ट कमिशन एजंट आणि आरटीओ एजंटला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सुमारे दीड कोटी रुपये किंमतीच्या बारा ट्रका जप्त करण्यात आल्या आहेत. देशभरात हे रॅकेट असल्याचा संशय जिल्हा पोलिस प्रमुख प्रविणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे(Sale of 27 trucks with modification in Dhule).

  दरम्यान इंजिन नंबरमध्ये फेरफार करुन ट्रकांच्या विक्री प्रकरणाचा संबंध प्रादेशिक परिवहन विभागाशी येत असल्याने आरटीओमधील कोणी सामील आहे का? याचाही तपास करण्यात येईल. तसेच स्क्रॅपच्या उद्योगातील काही यात सामील आहेत का? याची देखील पडताळणी केली जाईल असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

  धुळे शहरातील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि पोलिस कर्मचारी उपिस्थत होते.

  एलसीबी पीआय हेमंत पाटील यांना ट्रक्सची हेराफेरी बाबतची गुप्त माहिती खबर्‍यांमार्फत मिळाली होती. चाळीसगाव रोड भागातील इकरा कॉलनीत राहणार्‍या शेख साजीद शेख अब्दुल याच्या राहत्या घरासमोर जी.जे.08 ए.यु.7698 व एम.एच.38 एक्स 2602 तसेच कानुश्री मंगल कार्यालय देवपूर, धुळे येथील मोकळ्या जागेत 8 ट्रका उभ्या केल्या असून त्याने इंजिन आणि चेचीस नंबरमध्ये अदलाबदल केल्याची माहिती मिळाली होती.

  त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या ट्रक ह्या विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. पोलिसांच्या पथकाने हे ट्रक ताब्यात घेवून आरटीओ कार्यालयाकडून नोंदणीबाबतची माहिती घेतली असता चेचीस नंबर आणि इंजिननंबरमध्ये खाडाखोड झाली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रक्सची विक्री होत असल्याची खात्री झाल्यानंतर हे ट्रक ताब्यात घेवून चाळीसगाव रोड पोलिसात जप्त करण्यात आले.

  साजीश शेखची कसुन चौकशी केली असता त्याने बर्‍याच ट्रक आरटीओ एजंटांच्या मार्फत विकल्याचे सांगितले. 27 ट्रक बनावट इंजिन आणि चेचीस नंबर टाकून विकल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी सुमारे 1 कोटी 44 लाखांच्या 12 ट्रक जप्त केल्या आहेत. त्यातील 7 ट्रका ह्या महाराष्ट्र पासिंगच्या,3 गुजरातच्या तर एक राजस्थान व एक बिहार पासिंगची आहे.

  पोलिसांनी साजीद शेख, आरटीओ एजंट इफ्तेखार, अहमद अब्दुल जब्बार शेख उर्फ पापा एजंट ग.नं.1 तहसिल ऑफिस समोर,इकबाल रोड धुळे या दोघांना ताब्यात घेवून चाळीसगाव रोड पोलिसात भादंवि 420, 421,424, 464, 465, 471, 483, 489, 34 सह मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 192 (ब) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय प्रकाश पाटील करीत आहेत.

  एलसीबी पीआय हेमंत पाटील,एपीआय प्रकाश पाटील, पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, हे.कॉ.श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, रफिक पठाण, संजय पाटील, रविंद्र माळी, संदीप पाटील, प्रकाश सोनार, गौतम सपकाळे, राहुल सानप,संतोष हिरे, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी,मयुर पाटील, तुषार पारधी, विलास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

  कारवाई बाबतची माहिती देतांना जिल्हा पोलिस प्रमुख प्रविणकुमार पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.जप्त करण्यात आलेल्या गाड्या केवळ आपल्या राज्यातील नसून इतर राज्यातील देखील आहेत. त्यामुळे हेराफेरीचे हे रॅकेट देशव्यापी असू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.